Mohini Ekadashi 2022 : वैशाख शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला विशेष धार्मिक महत्त्व दिले गेले आहे. एकादशी तिथी भगवान विष्णूला अधिक प्रिय आहे. पौराणिक मान्यतेनुसार एकादशीला देवीने मुर नावाच्या राक्षसाचा वध केला. अशी मान्यता आहे की, या दिवशी प्रामाणिकपणे तसेच निष्ठेने केलेल्या या व्रताचा पूर्ण लाभ मिळतो. 12 मे 2022 रोजी म्हणजेच उद्या मोहिनी एकादशी (Mohini Ekadashi 2022) आहे. जाणून घेऊ महत्वाच्या गोष्टी


अत्यंत शुभ आणि फलदायी एकादशी
गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. ही एकादशी येते अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. मोहिनी एकादशीची (Mohini Ekadashi 2022) तिथी 11 मे रोजी सायंकाळी 7.31 वाजता सुरू होईल, तर 12 मे रोजी सायंकाळी 6.51 वाजता समाप्त होईल. मोहिनी एकादशी 2022 विशेष मानली जात आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी शनि आणि गुरु आपापल्या राशीत विराजमान असतील. शनि कुंभ राशीत आणि गुरू मीन राशीत भ्रमण करेल. 


शुभ मुहूर्त
मान्यतेनुसार, मोहिनी एकादशीचा (Mohini Ekadashi 2022) उपवास द्वादशी तिथीला केला जातो. 13 मे रोजी मोहिनी एकादशीचे व्रत (Mohini Ekadashi Fast) सोडता येणार आहे. मोहिनी एकादशी (Mohini Ekadashi 2022) व्रत पूर्ण करण्याचा शुभ मुहूर्त 13मे 2022 रोजी सकाळी 7:59 पर्यंत असेल.


मोहिनी एकादशी (Mohini Ekadashi 2022) व्रताची उपासना पद्धत 


या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यानंतर, पाटावर पिवळे आसन घालून भगवान विष्णूच्या मूर्तीची स्थापना करा. यासोबतच लक्ष्मीची मूर्तीही ठेवावी. पुजेसाठी फुले, फळे, नैवेद्य, धूप, दीप, अगरबत्ती लावून श्री हरिनारायण आणि माता लक्ष्मीची पूजा करा. पूर्ण भक्तिभावाने आणि मनापासून पूजा केल्यानंतर देवाची आरती करा, या दिवशी केळीच्या झाडाला पाणी अर्पण करा. याने श्री हरिनारायण आणि माता लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात आणि इच्छित परिणाम प्राप्त होतात.


व्रतामध्ये घ्या विशेष गोष्टींची काळजी
एकादशीच्या व्रतामध्ये काही विशेष गोष्टींची काळजी घेतली जाते. या दिवशी भात खाऊ नये. तुळशीची पाने तोडू नयेत. केस आणि नखे अजिबात कापू नका. भगवंताचे स्मरण करावे. पुण्यकर्मे करावीत.


धर्मशास्त्रात मोहिनी एकादशीचे मोठे पुण्य 


सर्व एकादशी एका बाजूला आणि मोहिनी एकादशी एका बाजूला, एवढे मोठे पुण्य मोहिनी एकादशीचे धर्मशास्त्रात सांगितले आहे. प्रभू रामचंद्रांनी एकदा वसिष्ठ ऋषींना सीतेच्या विरहानंतर व्याकुळ होऊन मनाच्या शांती आणि समाधानासाठी एखादे व्रत सांगण्याची विनंती केल्यावर वसिष्ठ ऋषींनी रामाला ही मोहिनी एकादशी करण्यास सांगितले होते. देवाने समुद्र मंथनाच्या वेळी घेतलेले मोहिनीचे रूप याच दिवशी घेऊन अमृताचे वाटप केल्याची मान्यताही असल्याने या एकादशीला मोहिनी एकादशी या नावाने संबोधले जाते. अंतःकरणातील सर्व विषारी मोह माया यांची बंधने तोडणारी अशी ही मोहिनी एकादशी असते. 


पंढरीची वारी आहे माझे घरी !
आणिक न करी तीर्थव्रत !!  


पंढरीची वारी करीत विठूरायाची उपासना


संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे भागवत संप्रदायातील लाखो वारकरी केवळ पंढरीची वारी करीत विठूरायाची उपासना आणि एकादशी करीत असतात. मोहिनी एकादशीस येणाऱ्या द्वादशीला देखील वारकरी संप्रदायात खूप मोठे महत्व असते. याच दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शी येथील भगवंत मंदिरात शेकडो वर्षांपासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होत असतो. एकादशीचा उपवास केल्यानंतर वारकरी द्वादशीच्या परण्याला म्हणजे उपवास सोडायला बार्शी येथील भगवंताच्या दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात.