Mahashivratri 2024: शिवभक्त वर्षभर ज्या महाशिवरात्रीची वाट पाहत असतात. तो दिवस 8 मार्च 2024 रोजी आहे. हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण देश महादेवाचा हा महान उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतो. शिवरात्रीच्या (Mahashivratri 2024)  दिवशी शिवाला प्रिय गोष्टी अर्पण केल्या जातात, ज्यामुळे महादेव लवकरच प्रसन्न होतात.   भगवान शंकराचे रूप इतर देवतांपेक्षा वेगळे आहे. शिवशंकराच्या गळ्यात नाग, केसात गंगा, डोक्यावर चंद्र आणि हातात त्रिशूल-डमरू आहे. हे सगळे शिवशंकरांचे प्रतीक मानले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का या सगळ्यामागे वेगवगळ्या कथा आहेत. पण कायमच भोलेनाथाच्या गळ्यात असलेल्या नागाकडे लक्ष जाते. परंतु तुम्हाला माहीत आहे का भगवान शंकराच्या गळ्यात नाग का असतो? आणि या नागाचे नाव काय आहे? जाणून घेऊया या मागे नेमकं काय कारण आहे.


भगवान शंकराच्या गळ्यात नाग का असतो? (Why Lord Shiva wear Snake his Neck?)


 भोलेनाथ केवळ मानवी भक्तीवरच नव्हे तर इतर सजीवांवरही आपली कृपा राखतो. असे म्हटले जाते की नाग-नागीण भोलेनाथला आपला देव मानतात. थोडक्यात भगवान शंकराची कृपा फक्त मानवावर नाही तर इतर सजीवांवर देखील होते.  म्हणूनच भगवान शिव नेहमी गळ्यात नाग आणि रुद्राक्षाची जपमाळ धारण करतात.


 भगवान शंकराच्या गळ्यात असलेल्या नागाचे नाव  काय? (What is Name Of Snake Lord Shiva wear his Neck?)


भगवान शंकराने गळ्यात धारण केलेल्या नागाचे नाव वासुकी नाग  (Vasuki Nag) आहे. नागराज वासुकी हा शिवभक्त होता आणि भगवान शिवाच्या भक्तीत तल्लीन होता. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी, राजा वासुकीने समुद्रमंथनाच्या वेळी दोरीचे काम केले होते. घर्षणात वासुकीचा रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. त्यामुळे वासुकीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने वासुकीला नागलोकाचा राजा बनवले आणि वासुकीला आपल्या गळ्यात दागिन्याप्रमाणे कायम ठेवण्याचे वरदान दिले.


वासुकी कसा बनला भगवान शंकराचा सेवक? 


नागकुळातील सर्व साप शिवाच्या प्रदेशात म्हणजे हिमालयात राहत होते. भगवान शिवाचेही  नागवंशीयांवर खूप  प्रेम होते.  सुरुवातीला सापांची पाच कुळं होती ज्यात शेषनाग, वासुकी, तक्षक, पिंगला आणि कर्कोटक यांचा समावेश होता. सापांच्या या पाच कुळांना देवांच्या श्रेणीत ठेवण्यात आले होते. यापैकी शेषनाग हा सापांचा पहिला राजा मानला जातो, त्याला अनंत या नावानेही ओळखले जाते. पुढे, शेषनागानंतर, वासुकी नागांचा राजा झाला, जो भगवान शिवाचा सेवक देखील झाला. वासुकीनंतर तक्षक आणि पिंगला यांनी राज्याचा ताबा घेतला.


हे ही वाचा :


Mahashivratri 2024 : 8 की 9 मार्च यंदा किती तारखेला साजरी होणार महाशिवरात्री? मुहूर्त आणि पूजा विधी


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)