Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीचा सण आता जवळ आला असून सध्या देशातील अनेक ठिकाणी महाशिवरात्रीच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. शिवशंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महाशिवरात्रीचा (Mahashivratri) दिवस श्रेष्ठ असल्याचं म्हटलं जातं. या दिवशी महादेवासोबत भक्त देवी पार्वतीची मनोभावे पूजा करतात. महादेव घरात भरभराटी आणतो, तर पार्वती देवीच्या कृपेने घरात सुख-समृद्धी नांदते.


महाशिवरात्रीला शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करत असाल, उपवास करत असाल. पण महादेवाच्या पूजेसोबत या दिवशी दानाला देखील विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीला काही गोष्टींचं दान केल्यास त्याचं चांगलं फळ तुम्हाला लवकरच मिळेल आणि भोलेनाथांची कृपा तुमच्यावर सदैव राहील. महाशिवरात्रीला कोणत्या वस्तूंचं दान केल्यास फायदे होतात ते जाणून घेऊया.


महाशिवरात्रीला या गोष्टींचं दान केल्यास मिळेल दुप्पट फळ


जल दान


महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होतं. शास्त्रात महाशिवरात्रीच्या दिवशी पिंडीवर जल अर्पण करण्यासोबतच जल दानाला देखील फार खूप महत्त्व आहे. या दिवशी पाणी वाटप केल्याने विशेष फळ प्राप्त होतं.


कच्च्या दुधाचे दान


महाशिवरात्रीच्या दिवशी गाईचं कच्चं दूध शिवलिंगाला अर्पण केल्याने अनेक फल प्राप्त होतात. पूजा पद्धतीनुसार, या दिवशी कच्चं दूध दान केल्याने घरात सुख-समृद्धी येते. याशिवाय महाशिवरात्रीला दूध दानामुळे कुंडलीतील चंद्रही बलवान होतो.


तूप दान


शास्त्रानुसार, महाशिवरात्रीला गाईच्या दुधापासून बनवलेलं शुद्ध देशी तूप दान केल्याने गरिबी दूर होते. महाशिवरात्रीला तूप दान केल्याने ज्ञान आणि बुद्धी देखील प्राप्त होते.


काळ्या तिळाचे दान


महाशिवरात्रीला तिळाचं दान केल्याने भोलेनाथांची विशेष कृपा प्राप्त होते, तसेच भोलेनाथांच्या कृपेने पितृदोषाने त्रासलेल्यांनाही या दोषापासून मुक्ती मिळते. या दोषाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी तीळ दान केल्याने शनिदोषही दूर होतो, कारण शनिदेवाचे गुरु हे भगवान शिव आहेत.


वस्त्र दान


महाशिवरात्रीच्या गरजू लोकांना कपडे दान केल्याने महादेव प्रसन्न होतात.  महाशिवरात्रीला वस्त्र दान करणाऱ्यांची तिजोरी नेहमी भरलेली राहते, त्यांना कधी पैशांची कमतरता भासत नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी वस्त्र दान केल्याने आर्थिक स्थिती सुधारते, असंही म्हटलं जातं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Mahashivratri 2024 : महाशिवरात्री अवघ्या 2 दिवसांवर; प्रियजनांना 'हे' संदेश पाठवून द्या खास शुभेच्छा