सांगली : सांगलीच्या जागेसाठी कोणी आग्रही भूमिका घेतली, कोणी घेतली नाही यावर मी बोलणार नाही. सांगलीची (Sangli Loksabha) जागा परंपरेनं काँग्रेसची आहे, आमचं मजबुत संघटन असून ती जागा लढण्यास आम्ही सक्षम असल्याचा पुनरुच्चार काँग्रेस आमदार विश्वजित कदम  यांनी केला. विश्वजित कदम (Vishwajeet Kadam on Sangli) यांनी नागपुरात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांची भेट घेतली. सांगलीच्या जागेवर ठाकरे आणि काँग्रेसकडून दावा सुरुच असल्याने तिढा सुटलेला नाही. आज महाराष्ट्राचे प्रभारी यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. काँग्रेस पक्ष आम्हाला जे सांगेल आणि तसेच महाविकास आघाडीत एकत्रितपणे सांगेल ते आम्हाला मान्य असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. 


सांगलीच्या एखाद्या जनावराला सुद्धा विचारलं तरी सांगेल


विश्वजित कदम म्हणाले  की, संजय राऊत काय बोलतात, यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. सांगलीच्या समाजकारण आणि राजकारणाचा इतिहास आणि भूगोल ज्याला माहित असणाऱ्या कुठलाही व्यक्तीला किंवा सांगलीच्या एखाद्या जनावराला सुद्धा विचारलं (संजय राऊत यांना टोला) तर तो सांगेल की सांगली काँग्रेस विचारधारेचा जिल्हा आहे. कारण शेतकऱ्यांची जनावरं असतात. त्यामुळे संजय राऊत कुठल्या अर्थाने बोलले मला माहित नाही. 


बदल घडावा म्हणून विशाल पाटील उमेदवार 


विश्वजित कदम म्हणाले की, सांगलीत गेले दोन निवडणुकीत भाजप खासदार निवडून आला आहे. त्यामुळे बदल घडावा म्हणून विशाल पाटील यांच्या रुपाने सक्षम उमेदवार आम्ही दिला आहे. आम्हाला कुणीही इशारा देऊ नये. काँग्रेस महाराष्ट्रात मजबूत पक्ष आहे. सांगलीच्या घराघरात काँग्रेसची विचारधारा आहे. त्यामुळे इतर कुणी सांगलीबाबत वक्तव्य कुणी करु नयेत, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला.   


आम्हाला इशारा देऊ नये


त्यांनी सांगितले की, आम्हाला इशारा देऊ नये, इशारा देण्याची आवश्यकता नाही. काँग्रेस हा सव्वाशे वर्षांचा राष्ट्रीय पक्ष आहे. आजच्या बैठकीला विशाल पाटील माझ्यासोबत आहेत. काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढण्यास आम्ही इच्छुक आहेत. हीच भावना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नेतृत्वाकडे सांगितले आहे. मी राज्यात काम करत असलो तरी, आजच्या घडीला फक्त सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचा आमदार म्हणून मी इथं आलो आहे. तिन्ही पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना निवडणुकीला सामोरे जात असताना तिन्ही पक्षाना एकमेकांची गरज आहे. याचा अर्थ असा नाही की कोणी कोणाला कमी लेखले पाहिजे. सांगलीबाबत नाना पटोले यांनी व्यक्त केलेली भावना ही कार्यकर्त्यांची ऐकूनच केली आहे. दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी भेट झाल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या