Ganesh Chaturthi 2023 : वर्षभराची आतुरता अखेर संपली आहे. कारण आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. हिंदू धर्मात श्रीगणेशाच्या (Lord Ganesh) पूजेला विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार भगवान गणेश ही प्रथम पूज्य देवता आहे. असे मानले जाते की, श्रीगणेशाची आराधना केल्याने सुख, समृद्धी, बुद्धिमत्ता आणि शक्ती इत्यादींचा आशीर्वाद मिळतो. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवसाला गणेश चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी लोक लाडक्या बाप्पाला घरी वाजतगाजत आणतात, तसेच त्याची प्रतिष्ठापना करून विधीपूर्वक पूजा करतात. 10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याला निरोप दिला जातो. मात्र यंदा गणेश चतुर्थीच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे, जाणून घ्या गणेश चतुर्थी कधी आहे?
गणेश चतुर्थी 2023 तारीख
हिंदू दिनदर्शिकेनुसार, यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12.39 वाजता सुरू होईल. 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1.43 वाजता समाप्त होईल. उदयतिथी वैध असल्याने, यावर्षी गणेश चतुर्थीचा पवित्र सण मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी रवियोगाचा शुभ संयोगही घडत आहे.
गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त
ज्योतिषांच्या मते, पंचागानुसार, 19 सप्टेंबर हा दिवस गणेश स्थापनेसाठी अतिशय शुभ आहे. 19 सप्टेंबर रोजी गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:01 ते दुपारी 01:28 पर्यंत आहे.
गणपती पूजनाचा मुहूर्त
असे मानले जाते की, श्रीगणेशाचा जन्म मध्यान्हकाळात झाला होता, म्हणून दुपारची वेळ गणेशपूजेसाठी अधिक शुभ मानली जाते. मध्य मुहूर्तामध्ये, भक्त पूर्ण विधींनी गणेशपूजा करतात, ज्याला षोडशोपचार गणपती पूजा असेही म्हणतात.
गणेशमूर्ती स्थापनेची पद्धत
सर्वप्रथम गंगाजल पदरावर शिंपडून घर शुद्ध करा.
यानंतर, चौरंगावर लाल रंगाचे कापड पसरवा आणि ते तसेच ठेवा.
श्री गणेशाची मूर्ती चौरंगावर बसवा.
आता गणपतीला स्नान करून गंगाजल शिंपडा.
रिद्धी-सिद्धीचे चिन्ह म्हणून मूर्तीच्या दोन्ही बाजूला एक एक सुपारी ठेवा.
गणेशाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेले भांडे ठेवा.
हातात अक्षता आणि फुले घेऊन गणपती बाप्पाचे ध्यान करा.
भगवान गणेशाच्या मंत्राचा जप करा: ऊँ गं गणपतये नमः.
अनंत चतुर्दशी कधी?
दरवर्षी गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला होते. यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवार, 28 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. या दिवशीच देशभरात गणेश विसर्जन होणार आहे.
गणेश चतुर्थीला करू नका चंद्रदर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनास मनाई आहे. असे मानले जाते की, या दिवशी चंद्र दिसल्याने एखादा खोटा आरोप किंवा खोटा कलंक लागतो, ज्यामुळे चोरीचा खोटा आरोप सहन करावा लागतो. अशी धारणा आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या