मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीसांकडून (Amruta Fadnavis) खंडणी वसुली प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी बुकी अनिल जयसिंघानीला (Anil Jaisinghani) जामीन मंजूर करण्यात आला. मुंबई सत्र न्यायालयाने 50 हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. बुकी अनिल जयसिंघानी हा 20 मार्चपासून अटकेत होता. जयसिंघानीची मुलगी आणि भाऊ या सहआरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला आहे. 


खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला हजेरी लावण्याचे आणि साक्षीदारांना न धमकावण्याचे निर्देश न्यायालयाने जयसिंघानीला दिले आहेत. अनिल जयसिंघानीवर मलबार हिल पोलीस ठाण्यात 20 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला होता. 


15 हजार कोटींचे फिक्सिंग नेटवर्क उघड


क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याचे 15 हजार कोटींचे मॅच फिक्सिंग नेटवर्क पोलीस तपासात उघड झालं आहे. त्याच्यावर ईडीने (Directorate of Enforcement) मनी लॉंड्रिंगप्रकरणी गुन्हा नोंद करून कारवाई केली आहे. अमृता फडणवीस  यांना लाच देण्याचा प्रयत्न आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न अनिल जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिने केला असल्याचा आरोप आहे. अमृता फडणवीस यांनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती. अनिक्षाने वडील जयसिंघानीवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यासाठी लाच देऊ केली असल्याचा आरोप आहे. अनिक्षाला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक केली. 


ईडीने 3.40 कोटींची संपत्ती जप्त केली 


या प्रकरणी अनिल जयसिंघानी याची 3.40 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त (Property Seized) करण्यात आली आहे. पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) म्हणजे आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित गुजरातमधील क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानीच्या मालकीची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.


जयसिंघानीची 3.40 कोटी किमतीची स्थावर मालमत्ता जप्त


ईडीने 9 जून रोजी जयसिंघानीच्या ओळखी असलेल्या परिसरात छापा टाकला. ईडीने आता जयसिंघानीची 3.40 कोटी किमतीची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे, ही जयसिंघानी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. याव्यतिरिक्त, ईडीने 6 जून रोजी अहमदाबाद येथील विशेष पीएमएलए न्यायालयासमोर आरोपी जयसिंघानीविरुद्ध फिर्यादी तक्रार दाखल केली.


अनिल जयसिंघानीचं मॅचफिक्सिंग नेटवर्क उघडकीस


क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याचे 15 हजार कोटींचे मॅच फिक्सिंग नेटवर्क याआधीच पोलीस तपासात उघड झालं आहे. या मॅच फिक्सिंग नेटवर्कमध्ये अनेक क्रिकेटपटू, आयपीएल फ्रँचाईसी (IPL), मालक आणि पोलिसांचा (Police) समावेश असल्याची चर्चा आहे. भ्रष्टाचार, ब्लॅकमेलिंग, मॅचफिक्सिंग आणि हवालाचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. पाकिस्तान आणि दुबईतील क्रिकेट बेटिंग कार्टेलशी संबंध असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. 


ही बातमी वाचा: