Diwali 2022: दिवाळीला  (Diwali 2022) नव्या वस्तू आणि कपडे अनेक लोक खरेदी करतात. दिवाळीमध्ये आकर्षक दिव्यांनी केलेल्या रोषणाईने आणि घराबाहेर काढलेल्या रांगोळ्यांने मन प्रसन्न होते. काही दिवसांनी दिवाळी साजरी केली जाणार आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी (Dhanteras 2022). या दिवशी धनाची पूजा केली जाते.  यंदा 22 ऑक्टोबर (शनिवार) धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात हा शुभ दिवस मानला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. पण काही वस्तू धनत्रयोदशीला खरेदी करणं अशुभ ठरते. कोणत्या वस्तू धनत्रयोदशीला खरेदी करु नयेत? याबाबत जाणून घेऊयात... 


लोखंडाच्या वस्तू 
लोखंड खरेदी केल्याने कुबेर प्रसन्न होत नाहीत.  त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू खरेदी करु नयेत. तसेच लोह हा शनिदेवाचा कारक मानला जातो. त्यामुळे लोखंडापासून तयार केलेल्या वस्तू धनत्रयोदशीला खरेदी करणं अशुभ मानले जाते. 


धार असणाऱ्या वस्तू 
धनत्रयोदशीला धार असणाऱ्या वस्तू  खरेदी करु नयेत.  चाकू, कात्री, पिन, सुया या वस्तू खरेदी करणे टाळावे. धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. 


प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू
प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी केल्यानं घरात समृद्धी येत नाही, असं म्हटलं जातं. त्यामुळे धनत्रयोदशीला प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करु नयेत. 


काचेच्या वस्तू 
काचेचा संबंध राहूशी आहे. त्यामुळे काचेपासून तयार केलेल्या वस्तू धनत्रयोदशीला खरेदी करु नयेत. काचेच्या वस्तू धनत्रोदशीला खरेदी केल्यानं घरात काही समस्या निर्माण होतील. 


अॅल्युमिनियमपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू


धनत्रयोदशीला अनेक लोक अॅल्युमिनियमची भांडी किंवा वस्तू खरेदी करतात. राहूचा प्रभाव अॅल्युमिनियमवरही खूप असतो. याला अशुभ मानलं जातं. त्यामुळे धनत्रयोदशीला अॅल्युमिनियमच्या वस्तू खरेदी करणे टाळावे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: