Blog: करिअरमध्ये विशिष्ट उंची गाठताना अनेक व्यक्ती विविध पातळ्यांवर संघर्ष करतात आणि तिथे पोहोचतात. बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे 48 वर्षांपासूनचे ज्येष्ठ मेकअपमॅन दीपक सावंत यांच्याशी संवाद साधला. तेव्हा ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली. दीपक सावंतांनी (Deepak Sawant) या मुलाखतीमध्ये बिग बींशी असलेलं नातं तर उलगडलंच. शिवाय आपला स्ट्रगलही सांगितला.


मुलाखतीच्या एका टप्प्यावर ते म्हणाले, माझा आणि बच्चन साहेबांचा दोघांचाही संघर्ष मी जवळून पाहिला. माझ्याबद्दल सांगायचं तर मी असेही दिवस पाहिलेत जेव्हा मी पोळी पाण्यात बुडवून खाल्लीय. मिळणारा प्रत्येक रुपया मी अत्यंत काळजीपूर्वक खर्च करायचो. तेव्हा मी त्यांना विचारलं, आज तुम्ही जेव्हा आलिशान मर्सिडीजमधून उतरता तेव्हा ते दिवस तुम्हाला आठवतात का? दीपक सावंतांचे शब्द थांबले आणि डोळे बोलू लागले. डोळे डबडबले. त्या डोळ्यांनी सर्व सांगितलं होतं. करिअरमधला असा संघर्षाचा पॅच जेव्हा तुम्ही जगता, तेव्हा तुमचं आयुष्य अंतर्बाह्य बदलून जातं.


मला थेट ढोलकीसम्राट विजय चव्हाणांची मी घेतलेली एक मुलाखत आठवली. तेव्हाही त्यांनी एक अंतर्मुख करणारी आठवण सांगितली होती. ते म्हणाले होते, मी जेव्हा उस्ताद झाकिर हुसेन साहेबांसोबत जगातल्या विविध देशांमध्ये परफॉर्म केलंय, तेव्हा आमच्या वास्तव्यासाठी आयोजकांकडून आलिशान हॉटेलच्या रुम्स बुक असायच्या. आमची वॅनिटी व्हॅन म्हणजे जणू फाईव्ह स्टार हॉटेलच असायचं. त्यावेळी मला ते दिवस आठवले, जेव्हा मी डोंगरी-पायधुनीला जाऊन मध्यरात्री एक-दीड वाजता बुर्जी-पाव खायचो. विजय चव्हाणांच्या त्या मुलाखतीच्यावेळीही माझ्या अंगावर असाच काटा आला होता, जसा दीपक सावंतांच्या मुलाखतीवेळी आला.या माणसांना मिळणारे पुरस्कारांचे, सन्मानांचे गुच्छ आपल्याला दिसतात. पण, त्या वाटेतले अडचणींचे, आव्हानांचे काटे आपल्याला दिसत नाहीत.या काट्यांवरुन चालून ही माणसं रक्तबंबाळ होतात, पण, चालणं थांबवत नाहीत. कदाचित त्या सांडलेल्या रक्तातूनच संघर्षाचा अंकुर जन्म घेत असावा.या मुलाखतीत दीपक सावंत यांनी मेकअपमधील काही मूलभूत गोष्टी उलगडून सांगितल्या. ते म्हणाले, मी मेकअप करताना कॅरेक्टरचा विचार करतो, अभिनेता कोण आहे याचा नाही. तसंच मी सीन बाय सीन त्या त्या व्यक्तीचा मेकअप खुलवत जातो.


'अक्का' हा सिनेमा दीपक सावंत यांचीच निर्मिती. ज्यामध्ये बिग बींनी पाहुण्या कलाकाराची भूमिका पार पाडली आहे. या सिनेमाच्या एका गाण्यात अमिताभ यांच्यासोबत जया बच्चनही आहेत. तीही आठवण दीपक सावंत यांनी आवर्जून सांगितली. याशिवाय स्मिता पाटील यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही त्यांनी या मुलाखतीत उलगडला. दीपक सावंत यांचं वय 74 आहे, असं त्यांनी सांगितलं, तेव्हा मी थक्क झालो. त्यांचं खणखणीत चालणं, शेकहँड करताना त्यांनी हातात हात घेतला, तेव्हा त्या हाताची मजबूत पकड त्यांच्या फिटनेसची साक्ष देत होती. ते म्हणाले, अमितजी स्वत: 80 वर्षांचे असून स्वत:ला कधी वृद्ध समजत नाहीत. कायम सकारात्मक ऊर्जेने भरलेले असतात. त्यांच्यासोबत काम करताना तुम्हीही त्याच पॉझिटिव्ह एनर्जीने पुढे जाता. तो वक्तशीरपणा मग तुमच्यातही भिनतो. ती शिस्त तुम्हालाही आपलीशी करते.


मुलाखतीची सांगता करताना मी त्यांना अमिताभ यांचा त्यांना भावलेला गुण विचारला, तेव्हा त्यांनी सांगितलं, इतकी वर्षे अभिनय जगतावर राज्य करुन अमितजी तितकेच समर्पित वृत्तीने काम करतात आणि पाय जमिनीवर राखून आहेत.असा संवाद तुम्हाला माणूस म्हणून बरंच काही देऊन जात असतो. याचसोबत तुम्हाला अधिक जबाबदारीचं भान देत असतो हेच खरं.