Dhanteras 2023: दिवाळी (Diwali 2023) सण अगदी उंबरठ्यावर आला आहे. दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत, खरेदीसाठी लोकांची लगबग सुरू आहे. खरं तर, धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होते. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी (Dhanteras 2023) साजरी केली जाते. यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला आहे, तर लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबरला आहे.


धनत्रयोदशीचा दिवस कुबेर, माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीला समर्पित आहे. या दिवशी त्यांची पूजा केल्याने धन, संपत्ती, वैभव, आरोग्य आणि यश प्राप्त होतं. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी नव्या वस्तू, सोने- चांदीची खरेदी केली जाते. शुभ मुहूर्तावर खरेदी केल्यास धनात 13 पटीने वाढ होते, असं मानलं जातं. तर यंदाचा खरेदी आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया.


खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता?


सनातन धर्मात धनत्रयोदशी दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी भांडी किंवा इतर घरगुती वस्तू खरेदी करणं फायदेशीर ठरतं. या दिवशी लोक विशेषत: सोनं किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करतात. या दिवशी खरेदीसाठी शुभ मुहूर्त असतात, या शुभ मुहूर्तावर ही खरेदी केल्यास संपत्तीत तेरा पटीने वाढ होते, असं म्हटलं जातं.


पंचांगांनुसार, यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी (10 नोव्हेंबर) खरेदीसाठी शुभ मुहूर्त दुपारी 12.35 पासून सुरू होईल. हा खरेदी मुहूर्त 11 नोव्हेंबरला, म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी 6.40 पर्यंत वाजता संपेल. या काळात सोनं खरेदी केल्याने तुमची संपत्ती अनेक पटींनी वाढते, असं मानलं जातं. या दिवशी तु्म्ही दुपारपासून रात्रीपर्यंत खरेदी करू शकता.


पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?


धनत्रयोदशीच्या संध्याकाळी प्रदोष काळात गणेश, लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाईल. या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:47 पासून सुरू होईल आणि 7:47 पर्यंत चालेल. या वेळेत पूजा केल्याने अधिक लाभ मिळेल.


धनत्रयोदशीची पूजा पद्धत


धनत्रयोदशीच्या संध्याकाळी उत्तर दिशेला कुबेर, भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. पूजेच्या वेळी तुपाचा दिवा लावावा. कुबेरांना पांढरी मिठाई आणि भगवान धन्वंतरीला पिवळी मिठाई अर्पण करा. पूजा करताना कुबेर मंत्राचा जप करावा. त्यानंतर धन्वंतरी स्तोत्राचं पठण करावं. यानंतर गणेश आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. लक्ष्मी आणि गणपतीला फुलांचा नैवेद्य दाखवावा. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर आणि अंगणात दिवे लावण्याची परंपरा आहे. कार्तिक कृष्ण पक्ष त्रयोदशीच्या रात्री यमाची पूजा करून दक्षिण दिशेला अर्पण करणाऱ्याला अकाली मृत्यूची भीती वाटत नाही, असा उल्लेख शास्त्रात आहे. त्यामुळे या दिवशी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवा लावला जातो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Margi: 2025 पर्यंत शनि साडेसाती असणाऱ्यांवरही असणार शनिदेवाची कृपा; सुरू होणार 'या' राशींचे चांगले दिवस