Dasara 2023: आज संपूर्ण देशभरात दसरा (Dasara) साजरा केला जात आहे. दसऱ्याच्या संध्याकाळी सर्वत्र रावण दहन होताना दिसेल. खरं तर संपूर्ण देश रावणाला वाईटाचं प्रतीक मानून दसऱ्याच्या दिवशी त्याचं दहन करतो. पण या देशात अशा काही जागा आहेत जिथे रावणाची पूजा केली जाते. देशात एक असंही ठिकाण आहे, जेथील लोक रावणाला आपला जावई मानतात. या ठिकाणाशी रावणाचा इतका खोल संबंध कसा? आणि लोक अजूनही रावणाला आपला जावई का मानतात? हे जाणून घेऊया.
नेमकी कुठे केली जाते रावणाची पूजा?
आपण ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत ते ठिकाण मध्य प्रदेशात आहे. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये लोक रावणाला आपला जावई मानतात, त्यामुळे तेथीस लोक त्याची पूजा करतात. असं म्हणतात की रावणाची पत्नी मंदोदरीचं मंदसौरमध्ये घर होतं, त्यामुळे तेथील लोक आजही रावणाला आपला जावई मानतात.
रावणाच्या पुतळ्याची पूजा केली जाते
एकीकडे दसऱ्याच्या संध्याकाळी संपूर्ण देशात रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं. मंदसौरमध्ये मात्र रावणाच्या पुतळ्याची पूजा केली जाते. मंदसौरच्या रुंडीमध्ये रावणाची मूर्तीही आहे, ज्याची पूजा केली जाते. येथे लोक रावणाला पुष्पहार अर्पण करून पूजा करतात. मंदसौर व्यतिरिक्त इतरही अनेक ठिकाणी रावणाची पूजा केली जाते. भारताव्यतिरिक्त श्रीलंकेतही अनेक ठिकाणी रावणाची पूजा केली जाते.
येथे आजही आहे रावणाचा मृतदेह
श्रीलंकेच्या रगैला जंगलात रावणाचं पार्थिव सुमारे 8 हजार फूट उंचीवर ठेवण्यात आल्याचं मानलं जातं. लोकांचा असा विश्वास आहे की, रावणाचा मृतदेह येथे ममीच्या रुपात जतन करण्यात आला आहे. श्रीलंकेला भेट देणाऱ्या लोकांसाठी हे ठिकाण आणि रावणाचा राजवाडा हे एक मोठं पर्यटनस्थळ आहे. यामुळेच श्रीलंका सरकारला दरवर्षी या ठिकाणचा भरपूर फायदा होतो.
उत्तर प्रदेशातही केली जाते रावणाची पूजा
उत्तर प्रदेशातील कानपूरमधील शिवाला येथे दशानन मंदिर आहे. हे रावणाचं मंदिर असून दसऱ्याच्या दिवशी पहाटेपासूनच भाविक रावणाची पूजा करण्यासाठी तिथे पोहोचतात. हे मंदिर शेकडो वर्षं जुनं आहे आणि विशेष म्हणजे हे मंदिर एकदाच उघडलं जातं. हे मंदिर विजयादशमीच्या दिवशीच उघडलं जातं.
रावणाला मानणारे दसऱ्याच्या दिवशी पहाटेपासून येथे पोहोचतात आणि पूजा सुरू करतात. दशानन मंदिरात शक्तीचं प्रतीक म्हणून रावणाची पूजा केली जाते. विजयादशमीच्या दिवशी सकाळी आठ वाजता मंदिराचे दरवाजे उघडले जातात आणि रावणाच्या मूर्तीची सजावट करण्यात येते, आजही सकाळी 8 वाजता रावणाच्या मंदिरात पूजा करण्यात आली आहे, यानंतर आरती देखील झाली. या मंदिराची स्थापना 1890 मध्ये गुरु प्रसाद शुक्ल यांनी केली होती.
हेही वाचा:
Dasara 2023: दसऱ्याच्या दिवशी करा 'हे' उपाय; आर्थिक समस्या होतील दूर, समृद्धीही नांदेल