Ram Navami 2024 In Ayodhya : 17 एप्रिलच्या रामनवमीचा (Ram Navami 2024) उत्साह देशभरात शिगेला पोहोचलेला आहे. राम मंदिर निर्मितीनंतर साजरा होणारा हा पहिलाच जन्मोत्सव असल्याने लाखोंच्या संख्येनं भाविकांच्या गर्दीची शक्यता आहे. 


सध्याच्या घडीला 22 जानेवारीला मंदिर (Ayodhya Ram Mandir) खुलं झाल्यापासून दररोज साधारणपणे एक लाख भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी येतात. पण यंदाची रामनवमी रेकॉर्डब्रेक गर्दीची ठरण्याची शक्यता आहे. 


रामनवमीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोईच्या दृष्टीने राममंदिर तीर्थक्षेत्राने काही विशेष सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. सोबतच दर्शनासाठी येताना काही विशेष सूचनांचं पालन करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे. 


रामनवमीच्या दिवशी रामभक्तांसाठी अयोध्येतली व्यवस्था कशी असेल?


रामनवमीच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीराम आपल्या भक्तांना नेहमीपेक्षा अधिक वेळ दर्शन देतील. रामनवमीला भक्तांची संख्या विचारात घेता रामलल्लांच्या दर्शनाची वेळ रोजच्यापेक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत दर्शनाची वेळ 19 तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 


दररोज सर्वसाधारणपणे या दर्शनासाठी 45 मिनिटं ते 1 तासांपर्यंतचा वेळ लागतो. पण रामनवमीला होणारी गर्दी विचारात घेता भाविकांना जरा जास्त वेळही रांगेत उभं राहावं लागू शकतं. 


रामनवमीच्या दिवशी पहाटेच्या मंगला आरतीपासून रात्री 11 वाजेपर्यंत प्रभू रामांचं दर्शन घेता येणार आहे. रामलल्लाची मंगला आरती दररोज पहाटे 4:30 वाजता संपन्न होते. त्यामुळे रामनवमीला रामलल्ला पहाटे साडेचार ते रात्री अकरा वाजेपर्यंत आपल्या भक्तांना आशीर्वाद देतील. 


नैवेद्याच्या वेळीही केवळ पाचच मिनिटं मंदिर बंद असेल


दिवसातून दररोज चार वेळा रामलल्लांना नैवेद्य दाखवला जातो. दिवसभरातल्या आरत्या आणि नैवेद्याची वेळ यादरम्यान राम मंदिर दर्शनासाठी बंद ठेवलं जातं.  पण रामनवमीच्या काळात हा वेळ वाचवण्याचा प्रयत्न तीर्थक्षेत्राने केलाय. दिवसभरात दाखवल्या जाणाऱ्या चार नैवेद्यांसाठी मंदिर फक्त पाच मिनिटं बंद ठेवलं जाईल, जेणेकरुन भाविकांची गैरसोय होणार नाही. त्यांना रांगेत फार काळ उभं रहावं लागणार नाही.  


पहाटे 3:30 पासूनच दर्शन रांगा खुल्या


रामनवमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरच दर्शन रांगेत उभं राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. रामलल्लाची मंगला आरती सुरू होण्याच्या एक तास आधीच भाविकांना दर्शनासाठी रांग लावता येणार आहे. 


नो व्हिआयपी दर्शन


रामनवमीला होणाऱ्या गर्दीचा विचार करता कोणतेही विशेष दर्शन पासेस आणि आरतीचे पासेस न देण्याचा निर्मय राम मंदिर तीर्थक्षेत्राने घेतला आहे.  सर्व रामभक्तांना एकाच रांगतून दर्शन घेण्याची विनंती तीर्थक्षेत्राकडून करण्यात आली आहे. यासोबतच विशेष अतिथी किंवा व्हीव्हीआयपी यांनी गर्दी टाळून 19 एप्रिलनंतरच दर्शनासाठी येण्याचं आवाहन रामजन्मभूमीकडून करण्यात आलं आहे.


16 ते 19 एप्रिल दरम्यान कोणतेही VIP पास, सुगम दर्शन पास आणि  मंगला आरती, शृंगार आरती आणि शयन आरती पास दिले जाणार नाहीत.


भाविकांनी आपला वेळ कसा वाचवावा?


राम मंदिरात रामनवमीच्या दिवशी दर्शनासाठी येताना सुलभ दर्शन होण्यासाठी फोन न आणण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  राममंदिरात फोन आणि इतर चीजवस्तू नेण्यास मनाई आहे. फोन किंवा आपल्यासोबतच्या वस्तू लॉकरमध्ये ठेवण्यासाठी आणि त्या परत घेण्यासाठी अंदाजे अर्धा तास लागतो. रामनवमीला होणारी गर्दी विचारात घेता लॉकर सेवेवरचा ताण वाढलेला असेल. त्यादिवशी मोबाईल किंवा इतर वस्तू लॉकरमध्ये ठेवण्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. हा वेळ वाचावा आणि दर्शन लवकर व्हावं, यासाठी भाविकांनी दर्शनासाठी येताना मोबाईल सोबत न बाळगलेला उत्तम असं आवाहन केलं गेलंय. 


उन्हापासून काळजी घ्या!


अयोध्येतला पारा सध्या चाळीशीपार आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येकानं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मंदिर परिसरात भक्तांचे पाय उन्हाने पोळू नयेत यासाठी खास मॅटही अंथरल्या गेल्या आहेत. भाविकांनी आपलं डोकं झाकून उन्हापासून स्वतःच रक्षण करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे. भाविकांचा परतीचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी एक विशेष सोय करण्यात आली आहे. 


दर्शन मार्गावरील प्रवासी सुविधा केंद्रात रामनवमीला होणारी देशभरातल्या भक्तांची गर्दी विचारात घेऊन रेल्वे आरक्षण केंद्रही उभारण्यात येणार आहे.  त्यामुळे रामनवमीला येणाऱ्या भाविकांची कोणतीही अडचण होऊ नये आणि त्यांना सुलभ दर्शन मिळावं यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रकडून विशेष व्यवस्था पहायला मिळते आहे.


हेही वाचा:


Ram Navami 2024 : रामनवमीला अवघ्या 2 तास 33 मिनिटांचा शुभ मुहूर्त; संपूर्ण पूजा-विधी आणि उपाय जाणून घ्या