Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही लोकप्रिय मालिका आता रोमांचक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आता या मालिकेचा विशेष भाग पार पडणार आहे. या विशेष भागाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


'ठरलं तर मग' मालिकेचा विशेष भाग
 
'ठरलं तर मग' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमापोटी मालिका गेल्या अनेक आठवड्यांपासून नंबर वन वर आहे. लवकरच प्रेक्षकांना अर्जुन-सायलीसोबत माथेरान फिरण्याची संधी मिळणार आहे. लग्नानंतर अर्जुन-सायलीने हनीमूनला जावं अशी अर्जुनच्या आईची इच्छा होती. 


आईच्या सांगण्यावरुनच हो नाही म्हणता म्हणता माथेरानच्या प्लॅनवर शिक्कामोर्तब झालं आहे. सुरुवातीला सायलीचा या ट्रीपला नकार होता. मात्र अर्जुनने आपल्या दोघांमध्ये मैत्रीचं नातं आहे, त्यामुळे हनीमून नाही तर या ट्रीपला फ्रेण्डमून म्हणून जाऊया असं सांगून त्याने सायलीचं मन वळवलं. माथेरान सफरीमध्ये नेमक्या काय गंमती-जंमती पाहायला मिळणार हे लवकरच कळेल.






सायली-अर्जुनवर प्रेक्षक जीवापाड प्रेम करतात : जुई गडकरी


माथेरानमधल्या शूटिंगच्या अनुभवाविषयी सांगताना जुई गडकरी (Jui Gadkari) म्हणाली,"अतिशय सुंदर अनुभव होता. सेटच्या बाहेर जाऊन आम्ही पहिल्यांदाच शूट केलं. मी मुळची कर्जतची. त्यामुळे लहानपणी अनेकदा माथेरानला फिरायला जायचे. लहानपणीच्या सगळ्या आठवणी शूटिंगमुळे जाग्या झाल्या. आमचे खूप सारे चाहतेही आम्हाला इथे भेटले. काहींची तर मालिकेत काम करण्याची इच्छाही माथेरान शूटिंगमुळे पूर्ण झाली आहे".


जुई पुढे म्हणाली,"खूप आपुलकीने आणि आदराने माथेरानला आमचं स्वागत झालं. खाण्यापिण्याची चंगळ होतीच पण मला सर्वात कौतुक वाटतं ते आमच्या तंत्रज्ञांचं. शूटिंगचा ताफा सांभाळताना त्यांची खरी कसरत होत होती. मात्र त्यांच्या उत्तम आणखीमुळेच शूटिंग छान पार पडलं. सायली-अर्जुनवर प्रेक्षक जीवापाड प्रेम करतात. माथेरान स्पेशल भाग पाहून हे प्रेम द्विगुणीत होईल याची खात्री आहे".


'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षक आवडीने पाहत आहेत. सध्या मालिकेत कोर्टरुम ड्रामा पाहायला मिळत आहे. एकीकडे अर्जुन महिपत आणि साक्षी शिखरे विरोधात पुरावे गोळा करुन मधुभाऊंना सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे आता सुभेदारांच्या घरी कल्पना अर्जुन आणि सायलीचं नातं आणखी घट्ट करण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. 


संबंधित बातम्या


Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' रोमांचक वळणावर; सायली-अर्जुन हनिमूनला जाणार? प्रोमोने वेधलं लक्ष