Ram Temples In India : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सोमवारी (22 जानेवारी 2024) अवघा देश रामाच्या रंगात रंगला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानंतर बहुतेक लोक आजचा (22 जानेवारी) दिवस अगदी दिवाळीप्रमाणेच साजरा करत आहेत, तर सजावटीने अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराची शोभाही वाढलेली दिसून येत आहे.


दरम्यान, आज देशातील काही इतर मोठ्या आणि प्रसिद्ध राम मंदिरांबद्दल (Ram Mandir) जाणून घेऊया, ज्याबद्दल तुम्ही कदाचित कधी ऐकलंही नसेल. ही मंदिरं वेगवेगळ्या राज्यात आहेत आणि येथेही मोठ्या संख्येने रामभक्त दर्शन घेण्यासाठी येतात.


1. रामराजा मंदिर, मध्य प्रदेश


मध्य प्रदेशातील ओरछा येथील हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. ओरछा येथील राणी कुंवरी गणेश ही रामाची मोठी भक्त होती असे म्हणतात. तिने त्याला अयोध्येतून बालस्वरूपात आणले होते. प्रभू रामाचीही मध्य प्रदेशात राजा म्हणून पूजा केली जाते. रामराजा मंदिर हे एकमेव मंदिर आहे, जिथे प्रभू रामाला दररोज चार वेळा बंदुकीची सलामी (गार्ड ऑफ ऑनर) दिली जाते.


2. काळाराम मंदिर, नाशिक, महाराष्ट्र


अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरातून 11 दिवसांच्या विशेष विधीची सुरुवात केली होती. हे मंदिर महाराष्ट्रातील नाशिक शहरातील पंचवटी परिसरात आहे. असे म्हणतात की, हे मंदिर त्याच ठिकाणी आहे जिथे प्रभू राम वनवासात राहिले होते. हे 1782 मध्ये सरदार रंगराव ओढेकर यांनी जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले होते. या मंदिरात भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणापासून बनवलेल्या मूर्ती आहेत आणि त्यांची उंची सुमारे 2 फूट आहे.


3. रामास्वामी मंदिर, तामिळनाडू


हे मंदिर 400 वर्षांपूर्वी राजा रघुनाथ नायकर यांनी कुंभकोणम, तामिळनाडू येथे बांधले होते. या मंदिरात रामायणाची झलकही पाहायला मिळते. गर्भगृहात भगवान राम आणि देवी सीता यांच्या मूर्ती विवाहाच्या मुद्रेत एकत्र बसलेल्या दिसतात. शत्रुघ्न आणि भरत यांच्यासह राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती मंदिरात आहेत. प्रभू रामाच्या डाव्या बाजूला शत्रुघ्न पंखा धरलेला दिसतो, तर भरत शाही छत्र धरलेला दिसतो आणि उजव्या बाजूला हनुमान दिसतो.


4. सीता रामचंद्रस्वामी मंदिर, तेलंगणा


भारतात हे राम मंदिर खूप प्रसिद्ध आहे. ते तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील भद्राचलममध्ये आहे. रामनवमीच्या दिवशी तिथे मोठी गर्दी जमते. राम नवमीला भगवान राम आणि सीता यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हे मंदिर भद्राचलम मंदिर (Bhadrachalam Temple) म्हणूनही ओळखले जाते. असे म्हटले जाते की, वनवासाच्या काळात भगवान राम, सीता आणि लक्ष्मण भद्राचलमपासून 35 किमी दूर पर्णशाला येथे राहिले. सीतेला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जात असताना भगवान रामाने गोदावरी नदी ओलांडली होती, असे स्थानिक लोक सांगतात. त्याच ठिकाणी नदीच्या उत्तरेला भद्राचलम मंदिर आहे.


5. त्रिप्रयार श्रीराम मंदिर, केरळ


हे मंदिर केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात आहे. तेथे भगवान राम त्रिप्रयारप्पन किंवा त्रिप्रयार थेवर म्हणून ओळखले जातात. असे मानले जाते की, भगवान श्रीकृष्ण या मंदिरात रामाच्या मूर्तीची पूजा करत असत. भगवान श्रीकृष्ण हे जग सोडून गेले तेव्हा मूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. नंतर ही मूर्ती काही मच्छिमारांना सापडली आणि त्यांनी ती केरळच्या चेट्टुवा भागात स्थापित केली गोली. नंतर वक्काइल कमल नावाच्या स्थानिक शासकाने त्रिप्रयार येथे मंदिर बांधले आणि तेथे मूर्तीची स्थापना केली. मंदिरात रामाची मूर्ती चार हातांनी शंख, चक्र, धनुष्य आणि माला धारण केलेली दिसते.


6. राम मंदिर, भुवनेश्वर, ओडिशा


हे मंदिर भुवनेश्वरच्या खारावेला नगरजवळ आहे. शहराच्या मध्यभागी स्थित मंदिर हे भगवान रामाच्या भक्तांसाठी सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात भगवान राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या सुंदर मूर्ती आहेत, ज्या एका खाजगी ट्रस्टद्वारे बांधल्या जातात आणि त्यांचे व्यवस्थापन केले जाते. याशिवाय मंदिर परिसरात हनुमान, शंकर आणि इतर देवतांची मंदिरं देखील आहेत.


7. कोदंडराम मंदिर, कर्नाटक


हे मंदिर कर्नाटकातील हिरेमागलूर येथे आहे, जे चिकमंगळूर जिल्ह्यात येते. या मंदिराला कोदंडराम असे नाव पडले आहे, कारण येथे भगवान राम आणि लक्ष्मण त्यांच्या धनुष्य आणि बाणांसह दाखवले गेले आहेत आणि भगवान रामाचे धनुष्य कोदंड म्हणून ओळखले जाते. गर्भगृहात हनुमान चौकीवर राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती आहेत. सर्वत्र रामाच्या डाव्या बाजूला सीता दिसत असली तरी या मंदिरात सीता रामाच्या उजव्या बाजूला आहे. असे मानले जाते की, एका भक्त पुरुषोत्तमने भगवान राम आणि सीता यांचा विवाह पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण झाली. पारंपारिक हिंदू विवाहादरम्यान वधू वराच्या उजव्या बाजूला बसते.


8. श्री राम तीरथ मंदिर, अमृतसर


हे मंदिर अमृतसरच्या पश्चिमेला 12 किलोमीटरवर चोगवान रोडवर आहे. हे ते ठिकाण आहे, जिथे सीतेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आश्रय मिळाला होता. येथेच तिने लव आणि कुशला जन्म दिला. येथे पायऱ्या असलेली एक विहीर देखील आहे, जिथे देवी सीता स्नान करत असे. अशा परिस्थितीत हे मंदिर भारतातील सर्वात पवित्र राम मंदिरांपैकी एक मानले जाते .


9. रघुनाथ मंदिर, जम्मू


जम्मूच्या या मंदिरात सात मंदिरे आहेत. हे उत्तर भारतातील सर्वात मोठ्या मंदिर संकुलांपैकी एक आहे. हे मंदिर महाराजा गुलाब सिंग आणि त्यांचे पुत्र महाराज रणबीर सिंग यांनी 1853-1860 या काळात बांधले होते. मंदिरात अनेक देवता आहेत, पण मुख्य देवता राम आहे, जो भगवान विष्णूचा अवतार आहे.


10. श्री सीता रामचंद्रस्वामी मंदिर, तेलंगणा


भद्राचलममधील सीता रामचंद्र स्वामी मंदिराचा इतिहास रामायणासोबत सामायिक केला आहे. हे मंदिर भद्राच्या आख्यायिकेशी संबंधित आहे. असे म्हणतात की, भद्राच्या प्रार्थनेला उत्तर देण्यासाठी भगवान विष्णूने जेव्हा रामाचे रूप धारण केले, तेव्हा ते एक सामान्य मनुष्य असल्याचे विसरले आणि त्याऐवजी ते चार हातांनी प्रकट झाले. तेव्हापासून भक्तांची चतुर्भुज वैकुंठावर श्रद्धा आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Ayodhya Ram Mandir : अवघ्या 84 सेकंदांच्या मुहूर्तावर रामाची प्राणप्रतिष्ठापना पूर्ण; 'या' राजयोगांनी आजचा दिवस सुफळ संपूर्ण