Ambedkar Jayanti 2024 : आज 14 एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Ambedkar Jayanti) यांची 133 वी जयंती साजरी केली जातेय. बाबासाहेबांनी समाजातील दुबळ्यांना सक्षम करण्यासाठी त्यांनी दीर्घ काळ लढा दिला आणि आपले संपूर्ण आयुष्य उपेक्षित वर्गाला समान हक्क मिळवून देण्यासाठी समर्पित केले. कनिष्ट जातीत जन्मलेल्या भीमराव आंबेडकरांना लहानपणापासूनच भेदभावाचा सामना करावा लागला. त्यांना समाजातील जातिव्यवस्था संपवायची होती. त्यानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. पण, यामागे फक्त एवढंच कारण नसून आणखीही मोठं कारण आहे. ते समजून घेऊयात.
आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 5 मे 1950 रोजी मुंबईत परतले होते. तेव्हा ‘जनता’ नियतकालिकाच्या प्रतिनिधीने डॉ. आंबेडकरांना ‘तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारणार का,’ असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरातही डॉ. बाबासाहेब आबंडेकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला याची उत्तरे मिळू शकतात. “बौद्ध धर्माकडे माझ्या मनाचा कल निश्चित झालेला आहे. कारण बौद्ध धर्माची तत्त्वे टिकाऊ आहेत. ही तत्त्वे समानतेवर आधारलेली आहेत,” असे आंबेडकर तेव्हा म्हणाले होते.
‘हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही…’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, असे असले तरी त्यांनी धर्मांतराचे संकेत बऱ्याच वर्षांआधी दिले होते. 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवल्यात एका परिषदेला संबोधित करताना ‘दुर्दैवाने मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, हा काही माझा अपराध नाही. परंतु, मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही,’ असे बाबासाहेब म्हणाले होते. आपल्या भाषणात त्यांनी हिंदू धर्मामधील असमानतेवरही बोट ठेवले होते. “आपले माणुसकीचे साधे अधिकार मिळवण्यासाठी आणि हिंदू समाजामध्ये समान दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी ही चळवळ निष्फळ ठरली आहे. त्या चळवळीसाठी व्यतीत केलेला वेळ, काळ, पैसा वाया गेला आहे. ही मोठी दु:खदायक वस्तुस्थिती आहे. म्हणूनच आपल्याला यासंबंधी अखेरचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आपल्या दुर्बलतेची, अवनतीची स्थिती आपण हिंदू समाजाचे घटक आहोत, म्हणून आपल्यावर ओढवली आहे. म्हणून जो धर्म समान दर्जा देईल, समान हक्क देईल आणि योग्य तऱ्हेने वागवील अशा एखाद्या दुसऱ्या धर्मात जावे, असे तुम्हाला वाटत नाही का?” असे डॉ. आंबेडकर यांनी आपल्या भाषणात विचारले होते. हे करतानाच बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडा, असे आवाहन आपल्या अनुयायांना केले होते. “हिंदू धर्माशी असलेला संबंध तोडा. स्वाभिमान आणि शांतता मिळेल, अशा दुसऱ्या धर्मात जा. परंतु लक्षात ठेवा जो धर्म तुम्ही निवडाल त्यात समान दर्जा, समान संधी आणि समान वागणूक मिळाली पाहिजे!” असे बाबासाहेब म्हणाले होते.
- प्रज्ञा म्हणजे अंधश्रद्धा आणि अलौकिक शक्तींविरुद्ध शहाणपण.
- करुणा म्हणजे प्रेम, दुःख आणि पीडितांबद्दल सहानुभूती.
- समानता म्हणजे धर्म, जात, लिंग, उच्च-नीच या विचारांपासून दूर राहून मानवाच्या समानतेवर विश्वास ठेवण्याचे तत्त्व.
बौद्ध धम्माचा अंगीकार करण्यामागे बाबासाहेबांचा असा विश्वास होता की, बौद्ध धर्म ज्ञान, करुणा आणि समतेचा संदेश देतो. यामुळे माणूस चांगले आणि सन्माननीय जीवन जगू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :