Amarnath Yatra 2024 : जम्मू-काश्मीरमधील सुप्रसिद्ध अशा अमरनाथ धाम यात्रेला (Amarnath Dham Yatra) 29 जून रोजी सुरुवात झाली आहे. भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्याशी संबंधित असलेला हा धाम शिव आणि शक्ती अशा दोन्ही गोष्टींचं प्रतीक आहे. अनेक आव्हानं आणि संकटं असूनसुद्धा अमरनाथ यात्रेला दरवर्षी लाखो भक्तांची रीघ लागलेली असते. असं म्हणतात की, सर्वात आधी महर्षि भृगू यांनी अमरनाथ गुहा यात्रा केली होती.
अमरनाथ येथील बाबा बर्फानी यांच्या संबंधित आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक रहस्यमय तसेच पौराणिक कथा आहेत.
अमरनाथ कथा आणि कबूतरांचा जोडा
पौराणिक कथेच्या मान्यतेनुसार, भगवान शिव हे देवी पार्वतीला अमरत्वाची गोष्ट ऐकविण्यासाठी याच गुहेत घेऊन आले होते. याच दरम्यान देवी पार्वतीला झोप आली. पण, त्या ठिकाणी उभा असलेला कबूतरांचा एक जोडा भगवान शिव यांची गोष्ट ऐकत होता. या दरम्यान तो वारंवार आवाजसुद्धा काढत होता. ज्यामुळे भगवान शिव यांना वाटलं की देवी पार्वती गोष्ट ऐकतायत.
भगवान शंकर यांची गोष्ट ऐकल्यानंतर कबुतरांनासुद्धा अमरत्व प्राप्त झाले. त्या दिवसापासून ते आता अमरनाथ गुहेचं दर्शन करताना कबुतरं दिसतात. मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे की, जिथे ऑक्सिजनचं प्रमाण फार कमी आहे आणि खाण्या-पिण्याचंही दूरवर कुठे साधन नाही त्या ठिकाणी हे कबूतर कशा प्रकारे राहत असतील.त्यामुळे या ठिकाणी कबुतरांचं दर्शन होणं म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती यांचं दर्शन होण्याच्या समानच मानलं जातं.
अमरनाथच्या गुहेचा इतिहास
अमरनाथ गुहेच्या इतिहासात महर्षि कश्यप आणि महर्षि भृगू यांचंदेखील वर्णन करण्यात आलं आहे. कथेच्या मान्यतेनुसार, एकदा पृथ्वीचा स्वर्ग मानला जाणारा काश्मीर जलमग्न झाला आणि मोठ्या नदीत वाहून गेला. जगाच्या कल्याणासाठी ऋषी कश्यप यांनी त्या पाण्याला छोट्या-छोट्या नद्यांच्या माध्यमातून वाहून दिले. त्या दरम्यान ऋषि भृगू हिमालयाच्या यात्रेला निघाले होते. जलस्तर कमी झाल्याने हिमालयाच्या पर्वत श्रृंखलेत सर्वात आधी महर्षि भृगू यांनी अमरनाथची पवित्र गुहा आणि बाबा बर्फानी यांचं शिवलिंग पाहिलं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :