Yavatmal Farmers Suicide : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याची ओळख राज्य आणि देशात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा किंवा शेतकरी आत्महत्येची स्मशानभूमी अशी झाली होती. यवतमाळ जिल्ह्यातून शेतकरी आत्महत्याचं (Farmers Suicide) लोण हे संपूर्ण राज्यसह देशात पसरलं होतं. 2001 ते 2005 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची जी परिस्थिती होती, अगदी तशीच परिस्थिती आता निर्माण होते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. याला कारण आहे गेल्या काही महिन्यात समोर आलेले शेतकरी (Farmer) आत्महत्यांची आकडे. दर दिवशी एक शेतकरी आत्महत्येमुळे यवतमाळ जिल्ह्यात आणि पर्यायाने विदर्भात (Vidarbha) शेतकरी आत्महत्यांचं सत्र पुन्हा सुरु होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. 


यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांबद्दलची परिस्थिती नेमकी काय आहे? 


मागील पाच महिन्यातील शेतकरी आत्महत्या


महिना        शेतकरी आत्महत्या
जुलै                    18 
ऑगस्ट                43
सप्टेंबर                 31
ऑक्टोबर             27
नोव्हेंबर               25
 
------------


वर्ष                    शेतकरी आत्महत्या
2001 ते 2006              803
2007 ते 2014            2279
2015 ते 2016              658
2017 ते 2018              497
2019                          288
2020                          319
2021                          290
नोव्हेंबर 2022 पर्यंत       276


शेतकी आत्महत्यांची आकडेवारी चिंता वाढवणारी


यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं आणि शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करु अशी केली. परंतु ही घोषणा हवेतच विरल्याचं चित्र आहे. शासनाकडे कोणताही ठोस कार्यक्रम नसल्याने शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे 2001 सारखी परिस्थिती निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 


शेतकरी आत्महत्यांचं कारण काय?


शेतमालाला न मिळालेला भाव, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, दुबार पेरणी, अवकाळी पावसाचा फटका आणि वातावरणात झालेला बदल यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अशातच शेतकऱ्यांना शासनाकडून दिली जाणारी तुटपुंजी मदत ही त्यांना नाउमेद करणारी ठरत आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार नेमकं कोणतं पाऊल उचलणार हे पाहावं लागेल.  


यवतमाळ जिल्हा जो शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा ओळखला जातो, सरकारने या जिल्ह्यात ठोस उपाययोजना करुन हा जिल्हा रोल मॉडेल म्हणून समोर आणला तर शेतकरी आत्महत्या कमी होतील. यासाठी मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार आणि प्रशासकीय यंत्रणांनी ग्राऊंड लेव्हलवर जाऊन शेतकऱ्यांसाठी काम करणं आवश्यक आहे.   


संबंधित बातमी