Farmers suicide News : राज्यात परतीच्या पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. या परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची हाती आलेला घास या पावसानं हिरावून घेतला आहे. या नुकासनीमुळं सध्या शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळं काही ठिकाणी शेतकरी टोकाचं पाऊल उचलत आहेत. पिकांचं होणारं नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून  यवतमाळ जिल्ह्यातील दोन   शेतकऱ्यांनी एकाच दिवशी आत्महत्या (Farmers suicide) केल्या आहेत.
 
यवतमाळच्या मारेगाव आणि उमरखेड येथील दोन शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने यापुढेही जगावे कसे अशा विवंचनेत असताना आत्महत्या केल्याची घटना घडल्या.  यावर्षी राज्यात पिकांसाठी सरुवातीला समाधानकार पाऊस पडला होता. पीक परिस्थितीही समाधानकारक असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक परतीच्या पावसानं हिरावून घेतलं आहे. त्यामुळं आता शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहे. 


विष प्राशन करून  केली आत्महत्या


 मारेगाव तालुक्यातील चिंचाळा पंढरी गोविंदा नैताम  (52 वर्षे) असे आत्महत्या केलेल्य शेतकऱ्याचे नाव आहे. नैताम यांनी विष प्राशन करून आत्महत्या  केली. आहे. त्यांच्याकडे केवळ दोन एकर शेती असून यात कपाशीची लागवड केली होती. यावर्षी अतिवृष्टीमुळे पीक मातीमोल झाले असून खासगी कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्याने विष प्राशन करून जीवन संपवले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.


 गोठ्यात गळफास घेत केली आत्महत्या


दुसऱ्या घटनेत उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथील युवा शेतकऱ्याने  गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली. शंकर नामदेव आखरे (36) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ते निंगनुर येथे आपल्या शेतामध्ये कुटुंबासह राहण्यास होते. मृत शंकर यांच्यामागे आई-वडील, पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ असा  परिवार आहे. दोन्ही प्रकरणात पोलिस तपास करत आहेत.


गेली दोन वर्षे कोरोनाचं संकट होतं. त्या तणावातून शेतकरी जात असताना या वर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला. पिकाची स्थितीही चांगली होती. मात्र, परतीच्या पावसानं घात केला. शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलं आहे. यामुळं आता शेतकऱ्यांसमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. यातून शेतकरी टोकाचं पाऊस उचलत आहेत.