wheat News : भारतातून गहू निर्यात वाढवण्याच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकार मोरोक्को, ट्युनिशिया, इंडोनेशिया, फिलीपिन्स, थायलंड, व्हिएतनाम, तुर्की, अल्जेरिया आणि लेबनॉन या देशांमध्ये व्यापारी शिष्टमंडळे पाठवणार आहे. जागतिक स्तरावर धान्याच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, भारताने 2022-23 या वर्षात  विक्रमी 10 दशलक्ष टन गव्हाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गव्हाच्या निर्यातीसंदर्भात वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने, कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या  (अपेडा ) अंतर्गत, वाणिज्य, नौवहन आणि रेल्वेसह विविध मंत्रालयांचे प्रतिनिधी आणि निर्यातदारांचा समावेश असलेले  एक कार्य दल यापूर्वीच स्थापन केले आहे.


दरम्यान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांसारख्या प्रमुख गहू उत्पादक राज्यांमध्ये निर्यातीसंदर्भात  बैठकांचे आयोजन करण्याचे वाणिज्य विभागाचे नियोजन आहे. गहू निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दर्जेदार उत्पादनांची निर्यात सुनिश्चित करण्यासाठी हरियाणातील कर्नाल  येथे शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांसह विविध हितसंबंधितांची अशीच एक बैठक आयोजित केली होती. ही बैठक आयसीएआर -गहू आणि बार्ली संशोधन संस्था,  कर्नाल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तज्ञांनी गहू निर्यातीच्या क्षेत्रातील संधी आणि आव्हानांवर चर्चा केली.


भारतीय गव्हाच्या मागणीत वाढ


जागतिक बाजारपेठेत भारतीय गव्हाच्या मागणीत वाढ होत आहे. भारत  जागतिक स्तरावर गव्हाचा विश्वासार्ह पुरवठादार म्हणून उदयाला येण्याच्या दृष्टीने, गहू आयात करणाऱ्या देशांचे गुणवत्तेसंदर्भातील, सर्व नियम पाळण्याचा सल्ला शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांना देण्यात आला आहे. देशातून गहू निर्यातीला  चालना देण्यासाठी आम्ही गहू निर्यात मूल्य साखळीतील सर्व हितसंबंधितांना आमचे  पाठबळ  देत असल्याचे मत अपेडााचे अध्यक्ष एम अंगमुथु  यांनी सांगितले. परदेशी व्यापार महासंचालनालयाच्या अंदाजानुसार, भारताने 2021-22 मध्ये   2.05 अब्ज डॉलर्स मूल्याचा विक्रमी 7 दशलक्ष टन (मेट्रीक टन ) गहू निर्यात केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात एकूण निर्यात केलेल्या गव्हापैकी  सुमारे 50 टक्के गहू बांगलादेशला निर्यात करण्यात आला होता असेही त्यांनी सांगितले.


अलीकडेच, जगातील सर्वात मोठा गव्हाचा आयातदार असलेल्या इजिप्तने  भारतातून गहू घेण्यास सहमती दर्शवली होती. इजिप्शियन अधिकार्‍यांनी भारताला या सामरिक वस्तूचे मूळ म्हणून निश्चित केले आहे. इजिप्तने 2021 मध्ये 6.1 मेट्रिक टन गहू आयात केला तेव्हा इजिप्तला गहू निर्यात करु शकणार्‍या मान्यताप्राप्त देशांच्या यादीत भारताचा समावेश नव्हता. 2021 मध्ये इजिप्तच्या गहू आयातीपैकी 80 टक्क्यांपेक्षा जास्त गव्हाची आयात रशिया आणि युक्रेनमधून करण्यात आली. ती  2 अब्ज डॉलर्सच्या जवळपास असण्याचा अंदाज आहे. उत्तर आफ्रिकन देशात गहू आणि साखर आयातीचे व्यवस्थापन करणाऱ्या पुरवठा आणि वस्तूंचे सामान्य प्राधिकरण या इजिप्तच्या सार्वजनिक खरेदी  संस्थेकडे नोंदणी करण्यासाठी अपेडाने आधीच निर्यातदारांशी संपर्क साधला आहे.