नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवरील बंदी एक वर्षासाठी वाढवली आहे. साखर निर्यातीवरील बंदी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे अशी अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसरा सर्वात मोठा साखर निर्यातदार देश आहे.
जूनपासून बंदी लागू
देशातील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 1 जून 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली होती. निर्यातीवरील ही बंदी 31 ऑक्टोबर रोजी संपणार होती, जी आता एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. परकीय व्यापार महासंचालनालयने (DGFT) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हे निर्बंध टॅरिफ रेट कोटा अंतर्गत यूएस आणि युरोपियन युनियनला होणाऱ्या निर्यातीवर लागू होणार नाहीत.
निर्यातीत भारत देश दुसऱ्या स्थानी
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश आहे. भारतातून बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया आणि दुबईसह अनेक देशांमध्ये साखरेची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. गेल्या वर्षी भारताने विक्रमी पातळीवर साखर निर्यात केली होती. गेल्या वर्षी सरकारने निर्यातीसाठी 60 लाख मेट्रिक टन साखरेची मर्यादा निश्चित केली होती, तर 70 लाख मेट्रिक टन साखर निर्यात झाली होती. यावर्षी सुमारे 82 एलएमटी साखर निर्यात झाली.
यंदा किती उत्पादनाचा अंदाज?
यंदा देशात विक्रमी उसाचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. या हंगामात देशांतर्गत 27.5 दशलक्ष टन साखरेचा वापर होण्याचा अंदाज आहे. देशात ऑक्टोबर ते सप्टेंबर हा काळ साखरेचा हंगाम मानला जातो. 2022-23 हंगामात भारताचे साखरेचे उत्पादन अंदाजे 41 दशलक्ष टन असण्याचा अंदाज आहे. शिवाय 4.5 दशलक्ष टन इथेनॉल बनवण्याकडे वळवले गेले आहे जे चालू हंगामातील अंदाजे उत्पादनाच्या अंदाजे 1.8 दशलक्ष टन किंवा 4.6 टक्के अधिक असेल.
2021-22 हंगामात 3.4 दशलक्ष टनांच्या तुलनेत 2022-23 हंगामात इथेनॉल निर्मितीसाठी 4.5 दशलक्ष टन साखरेचे वळवण्याचा अंदाज असल्याचं मत इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) च्या मांडलं आहे. इथेनॉलकडे वळवल्यानंतर 2022-23 हंगामात साखरेचे उत्पादन सुमारे 36.5 दशलक्ष टन अपेक्षित आहे, तर पुढील हंगामातील खप सुमारे 27.5 दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. अतिरिक्त 9 दशलक्ष टन निर्यात करणे आवश्यक आहे, असे उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी सांगितले आहे.