Nanded News : मराठवाड्यातील अनेक शेतकरी अजूनही पारंपारिक शेतीलाच प्राधान्य देतात. मात्र काहीजण पारंपारिक शेतीसोबतच नवनवीन प्रयोग करतात. या नवीन प्रयोगातून यश मिळवत मोठं आर्थिक फायदाही त्यांना होतो. नांदेड जिल्हयातील (Nanded District) मालेगावमधील दोन शेतकरी भावांनी असाच काही प्रयोग केला आहे. मालेगाव येथील विलास व सतीश भागिरथ बाहेती या शेतकरी बंधुनी खजुराच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. खजूराच्या लागवडीतून त्यांनी अधुनिक शेतीची कास धरली असून, कमी खर्चात लाखो रुपये कमविण्याचा मार्ग त्यांनी शेतकऱ्यांना दाखवला आहे.


मालेगावमधील शेतकरी बाहेती बंधु हे पारंपारिक पिकांसोबतच शेतीत नवनवीन  प्रयोग करण्याचे धाडस करतात. यापूर्वी देखील त्यांनी अनेक यशस्वी प्रयोग केले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी खजूराची शेती करण्याचा निर्णय घेतला होता. पण खजुराची शेती करताना अनेकांना हे पिक आपल्याकडे येणार नाही. त्यामुळे त्याची लागवड करू नका असा सल्ला दिला होता. परंतू, बाहेती यांनी शेजारील परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे खजूर लागवड केलेल्या शेतीची पाहणी केली. याची संपूर्ण माहिती घेत अभ्यास केला. त्यानंतर लागवडीचा निर्णय घेतला. 


संपूर्ण अभ्यास केल्यावर खजूर लागवड करण्याचा निर्णय बाहेती बंधूंनी घेतला. यासाठी त्यांनी डिसेंबर 2019 मध्ये गुजरात राज्यातून खजुराचे बारही जातीचे एक फुट उंचीचे सातशे रुपयाला एक याप्रमाणे 100 रोपे आणली. यातही विविध प्रकार असून उती संवर्धन केलेली याच जातीची 3  हजार 500 रूपये किंमतीचे अधिक चांगली असल्याचे विलास बाहेती यांनी सांगितले. या शंभर रोपांची त्यांनी 30 गुंठयामध्ये काही अंतरावर लागवड केली. 


खजुराच्या शेतीतून कमीतकमी पैशातून जास्तीतजास्त पैसा


विशेष म्हणजे खजुराची लागवड केल्यावर यात अंतर पिकही घेता येते. या पिकाचा देखरेख खर्चही कमी असुन ऊन, वारा, पाऊस यांचा कुठलाही परिणाम या पिकावर होत नाही. विशेषतः एकदा लागवड केलेले झाड हे पुढे 20 वर्ष टिकते. वर्षातून एक ते दोन वेळा सेंद्रिय खत व थिंबकद्वारे पाणी द्यायचे. पाण्याचे प्रमाणही कमी लागते. कडक उन्हामुळे खजुराच्या फळाचे माधुर्य व गोडी अधिकच वाढते. लागवड करताना नर व मादी असे दोन्ही प्रकारची झाडे लावावी लागतात. पाचव्या वर्षी फळधारणा अपेक्षित आहे. परंतू, बाहेती यांनी लावलेल्या खजुराच्या झाडांना चौथ्याच वर्षी फळ लागले आहे. एका झाडाला चार ते पाच किलो फळ लागते. खजुराच्या शेतीतून कमीतकमी पैशातुन जास्तीतजास्त पैसा कसा कमवायचा हे खजुर शेतीतून बाहेती बंधूनी दाखवून दिले आहे.


वर्षकाठी एक लाखाचे उत्पन्न 


खजुराचे फळ अतिशय पौष्टीक असते. खजुरातुन भरपूर कॅलरीज मिळतात. खजुरामध्ये साखर, प्रोटिन्स, लिपीडस, फायबर्स, व्हिटामिन आणि कार्बोहायड्रेटस देखील मिळतात. शिवाय कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते. लागवडीसाठी साधरण 70 हजार रूपये इतका खर्च आला त्यानंतर प्रत्येक वर्षी फारसा खर्च लागत नाही. वर्षकाठी एक लाखपर्यंत उत्पन्न अपेक्षीत आहे, असे शेतकरी विलास बाहेती यांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Agriculture News : नांदेडमध्ये पिवळ्या टरबूज शेतीचा यशस्वी प्रयोग, 15 गुंठ्यात तीन लाखांचं उत्पन्न; वाचा गुलाब देशमुखांची यशोगाथा