Agriculture News : शेती क्षेत्रावर सातत्यानं विविध संकट येतात. या संकटांचा सामना करत काही शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. वेलवर्गीय फळांची लागवड करणाऱ्या नांदेड (Nanded) जिल्ह्यातील बारड (Barad) येथील गुलाब सखाराम देशमुख या शेतकऱ्याने यावर्षी प्रथमतच पिवळ्या रंगाच्या टरबुजाची (yellow watermelon) लागवड केली. यातून त्यांनी 15 गुंठ्यात तब्बल 15 टनांचे उत्पादन काढले आहे. या टरबूज विक्रीतून त्यांनी तीन लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतलं आहे. या टरबुजाला सरासरी 20 रुपये किलोचा दर मिळाला. 


गेल्या 10 वर्षांपासून टरबूज आणि खरबूज या पिकांची सातत्याने लागवड 


गुलाब देशमुख यांनी कमी खर्चात चांगले उत्पादन घेतलं आहे. नियोजनपूर्वक शेती करत कष्टाच्या घामाला दाम मिळतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. नांदेड जिल्ह्यात आता पिवळ्या रंगाच्या टरबूजाची भर पडली आहे. ग्राहकांच्या गर्दीने गुलाब देशमुख यांच्या पिवळ्या टरबूजाचा गोडवा अधिक वाढला आहे. गुलाब सखाराम देशमुख गेली वीस वर्षापासून प्रत्यक्षपणे शेती करत आहेत. केळी, हळद, टरबूज, खरबूज अशी नगदी पिके घेण्याकडे त्यांचा कल राहिला आहे. गेल्या दहा वर्षांपासून टरबूज आणि खरबूज या पिकांची सातत्याने ते लागवड करतात. 


100 दिवसांत तीन लाख रुपयांचे उत्पन्न 


कोरोनासारख्या भीषण काळातही त्यांनी टरबूज आणि खरबूज फळांची लागवड केली होती. उत्पादन तर चांगले होते परंतू लॉकडाऊनच्या बिकट परिस्थितीमुळं खर्चही पदरी पडला नाही, अशी विदारक परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. यावर्षीच्या टरबूज आणि खरबूज लागवडीतून त्यातही गारपिटीच्या तडाख्यातून वाचल्याने चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर बऱ्यापैकी उत्पन्न त्यांच्या हाती लागले आहे. गुलाब देशमुख यांची शेती राष्ट्रीय महामार्गालगत असल्यानं पिकांच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस पहारा द्यावा लागतो. अवघ्या 100 दिवसांत तीन लाख रुपयांचे उत्पन्न जरी पदरी पडले असले तरी यामागे मोठे व्यवस्थापन असल्याचे दिसून येते. त्यांच्या नवनवीन शेती प्रयोगातून आजूबाजूच्या नवतरुण शेतकरी पुत्रांना वेळोवेळी मार्गदर्शनही मिळत असते.


गांडूळ खताची मात्रा आवश्यक


टरबूज लागवडीअगोदर 25  डिसेंबर रोजी कोकोपीट ट्रे मध्ये बियाची लागवड करुन रोपे तयार केली. तयार झालेल्या रोपांची 20 जानेवारी रोजी 15 गुंठे शेतीत आठ फुटाच्या अंतरावर बेड तयार करुन किक पद्धतीने बेडवर लागवड करण्यात आली. पहिल्या टप्यात सुरुवातीचे दहा दिवस 15 ते 20 मिनिट पाणी पुरवठा करण्यात येत असे. पुढे जसजशी वेलांची वाढ सुरु होईल त्याप्रमाणं पाणी पुरवठ्यात वाढ करण्यात आली. फळ मोठे होताना शेवटपर्यंत दोन तास पाणीपुरवठा केला असल्याची माहिती गुलाब देशमुख यांनी सांगितली. रोप लागवडीच्या सुरुवातीस बेडवर गांडूळ खताची मात्रा आवश्यक त्या प्रमाणात वापरण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. 


 


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik Rain : अर्धा तास गारपीट झाली अन् टरबूज शेती उध्वस्त झाली, नाशिकच्या शेतकऱ्याने मांडली व्यथा