Success Story : अलिकडच्या काळात काही तरुण शेतकरी (Farmers) शेतीत नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. पारंपारिक पद्धतीनं शेती न करता आधुनिक पध्दतीनं शेती करत भरघोस उत्पादन घेतायेत. तर काही उच्चशिक्षीत तरुण नोकरीच्या मागे न लागता यशस्वी शेती करतायेत. अशाच एका सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण (Civil Engineer) घेतलेल्या तरुणानं 'लाल केळी'च्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. अभिजीत पाटील असं या शेतकऱ्याचे नाव आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा तालक्यातील वाशिंबे या गावात त्यांनी लाल केळीचं यशस्वी उत्पादन घेतलं आहे. पाहुयात त्यांची यशोगाथा.


नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय


अभिजीत पाटील हे करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावचे शेतकरी आहेत. त्यांनी चार एकर क्षेत्रावर लाल केळीची लागवड केली आहे. या चार एकर शेतीतून त्यांनी आत्तापर्यंत 35 लाखांचं उत्पन्न घेतलं आहे. हे उत्पन्न त्यांनी 13 महिन्यात घेतल्याची माहिती एबीपी माझाला दिली. गेल्या सात ते आठ वर्षापासून अभिजीत पाटील हे शेती करत आहेत. पुण्यातील डी वाय पाटील महाविद्यालतून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी नोकरीच्या मागे न लागता 2015 पासून शेती करण्याचा निर्णय घेतला. आज लाल केळीच्या शेतीतून ते लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत.


2020 मध्ये केली होती लाल केळीची लागवड


अभिजीत पाटील यांनी डिसेंबर 2020 मध्ये चार एकर क्षेत्रावर लाल केळीची लागवड केली होती. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये त्यांनी माल काढायला सुरुवात केली होती. टप्प्या टप्प्यानं त्यांनी या लाल केळीची विक्री केली. अभिजीत पाटील यांनी लाल केळीची पुणे, मुंबई, दिल्ली या ठिकाणी रिलायन्स आणि टाटा मॉलमध्ये विक्री केली. यातून चांगला नफा झाल्याची माहिती पाटील यांनी दिली. 


किलोला मिळतोय 55 ते 60 रुपयांचा दर


लाल केळीला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. सध्या एक किलोला 55 ते 60 रुपयांचा दर मिळत आहे. चार एकर क्षेत्रावर 60 टन माल निघाला होता. यातून त्यांना खर्च जाऊन 35 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाल्याची माहिती पाटील यांनी दिली. लाल केळी ही औषधी असते. त्यामध्ये पोषण गुणधर्म जास्त असतात. मेट्रो शहरामध्ये उच्च आणि श्रीमंत वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात लाल केळीला मागणी आहे. तसेच मोठ मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये देखील लाल केळीला मोठी मागणी असल्याचे पाटील यांनी सांगितले. पहिली चार एकर क्षेत्रावर लाल केळी होती. यावर्षी आणखी एक एकर क्षेत्रावरलाल केळीची लागवड केल्याचे पाटील यांनी सागंतले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Bhandara : भंडाऱ्यातील तरुण इंजिनिअरची शेतीत कमाल, काकडी उत्पादनातून अवघ्या महिनाभरात लखपती