BMC Covid Scam : कोविड सेंटर कथित गैरव्यवहाराप्रकरणी (BMC Covid Scam) ईडीनं (ED) बुधवारी ठाकरे गटातील नेत्यांच्या निकटवर्तीयांसह 15 ठिकाणी छापे टाकले. संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर (Sujit Patkar), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्ती मानले जाणारे पक्षाचे सचिव सुरज चव्हाण यांच्या घर तसेच कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. सनदी अधिकारी संजीव जैयस्वाल यांच्या निवासस्थानीसुद्धा कारवाई झाल्यानं ईडीला या सगळ्या छापेमारीतून नेमकं काय हाती लागलं? आणि यातून कोणाच्या अडचणी वाढणार? हे पहावं लागणार आहे. 


सुरज चव्हाण यांच्या घरी ईडी अधिकाऱ्यांनी तब्बल 13 तास छापेमारी केली, तर संजीव जैयस्वाल यांच्या घरीसुद्धा जवळपास 5 तास ही छापेमारी चालली. या सगळ्या कथित कोविड सेंटर घोटाळ्यामध्ये नेमकं सुरज चव्हाण आणि सनदी अधिकारी संजीव जैयस्वाल यांचा या घोटाळ्याशी काय संबंध? आयएएस अधिकारी संजीव जैयस्वाल यांची ईडीनं चौकशी का केली? यांसारखे प्रश्न चर्चेत होते. 


ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस हॉस्पिटलच्या टेंडर बोलीच्या वेळी संजीव जैयस्वाल अतिरिक्त महापालिका आयुक्त होते आणि महत्त्वाचं म्हणजे स्थापन करण्यात आलेल्या समितीचा भाग होते. ज्यांनी लाईफलाईन हॉस्पिटलला मॅनेजमेन्ट सर्व्हिसेस कंपनीला टेंडर दिलं. 


टेंडर प्रक्रियेवेळी ज्या कंपनीला हे कंत्राट द्यायचं आहे, त्या कंपनीकडे पूर्वीचा अनुभव आणि पात्रता याचा विचार करून एक कंत्राट देणं क्रमप्राप्त होतं. मात्र तपासात या कंपनीला पुरेसा अनुभव नसताना शिवाय या कंपनीकडे रुग्णसेवेसाठी पुरेशी मनुष्यबळ आणि साहित्य उपलब्ध नसतानासुद्धा या कंपनीला कंत्राट देण्यात आलं. 


आता संजीव जैयस्वाल यांनी असं असतानासुद्धा या कंपनीला कंत्राट का दिलं? याची ईडीकडून कसून चौकशी करत आहे. संजीव जैयस्वाल यांच्याशी काही इतर महानगर पालिका अधिकारी यांच्या घरीसुद्धा छापेमारी करण्यात आली आहे. जैयस्वाल व्यतिरिक्त, ईडीनं महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार आणि बीएमसीचे वैद्यकीय अधिकारी यांच्यावरही छापे टाकले आहेत. जे केंद्रीय खरेदी विभागात होते, ज्यांनी रुग्णालयांना ऑक्सिजन आणि इतर साहित्य पुरवठ्यासाठी समन्वय अधिकारी होते.


सुरज चव्हाण यांचा या कंत्राटाशी काय संबंध आहे ?


ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून काही सब टेंडर देण्यात आले, ज्यामध्ये वैद्यकीय साहित्य आणि सेवा पुरवण्याचे सब टेंडर होते. असं टेंडरशी संबंध सुरज चव्हाण यांचा येतो, त्यामुळे या संपूर्ण कंत्राटामध्ये आर्थिक व्यवहार होताना नियमांची उल्लंघन झालं का? यामध्ये कुठल्या प्रकारचा गैरव्यवहार करण्यात आला का? या सगळ्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. 


या सगळ्या प्रकरणांमध्ये आरोप नेमके काय आहेत?



  • आरोग्य सेवा पुरविण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला कंत्राट

  • करारासाठी बनावट कागदपत्रे सादर

  • पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काळ्या यादीत टाकल्याची माहिती कंपनीने लपविली

  • 100 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप

  • 38 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा