सांगली : जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील डाळींब शेतीवर 'पिन होल बोरर' किडीचे संकट आले आहे. त्यामुळे डाळींबाची झाडे काढून टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आहे.
आटपाडी तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी आतापर्यंत डाळिंबावरील तेल्या आणि मर या रोगाचा सामना करत डाळींब पिकवत होते. परंतु, आता या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसमोर पिन होल बोरर किडीचे संकट उभे ठाकले आहे. पिन होल बोरर या किडीच्या प्रादुर्भावातून डाळिंबाने लखडलेली झाडे पिवळी पडून नंतर वाळून जात आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या बागांमध्ये या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे अशा बागेतील डाळींबाची काही झाडे वाळून गेली आहेत तर काही झाडे पिवळी पडू लागली आहेत.
मागील दोन-तीन वर्षांमध्ये डाळिंबच्या बागेतून मर आणि अवकाळीचा सामना करत जेमतेम उत्पन्न घेतल्याचे आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावचे धोंडीराम भोसले हे शेतकरी सांगत आहेत. परंतु, आता त्यांची बाग पिवळी पडली असून गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्या दीड-दोन एकरातील 680 झाडावर पिन होल बोरर या किडीचा प्रादुर्भाव झला आहे. त्यामुळे भोसले यांचे मोठे नुकसान झाले आहे. किडीच्या प्रादुर्भावामुळे आता भोसले यांना शेतातील सर्व झाडे काढून टाकावी लागणार आहेत.
भोसले यांच्या शेतातील डाळिंबाची झाडे डाळिंबाने लखडली होती. परंतु,आता या किडीमुळे ही सर्व डाळिंबे खराब झाली आहेत. त्यामुळे हा हंगाम तर पूर्ण वाया गेला आहे. परंतु, किडीमुळे डाळिंबाची झाडेच तोडून टाकायची वेळ आली आहे. पिन होल बोरर ही कीड झाडाच्या खोडाला लागते. त्यामुळे झाडाला ठिकठिकाणी छिद्रे पडतात आणि त्यातून भुसा बाहेर पडतो. त्यामुळे हिरवे पाने पिवळी पडू लागतात आणि झाडे वाळायला सुरुवात होते. झाडावर डाळिंब असते मात्र झाडच वाळू लागल्याने डाळिंब देखील वाळून जातात अशी माहिती धोंडीराम भोसले यांनी दिली.
धोंडीराम भोसले यांच्या सारखीच तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची अवस्था आहे. आटपाडी तालुक्यात 15 हजार हेक्टरवर डाळिंब लागवड आहे. यातील आतापर्यंत 4 ते 5 हजार हेक्टर बागा या किडीच्या प्रादुर्भावाखाली आहेत. म्हणजे जवळपास आटपाडी तालुक्यातील 50 टक्के बागा किडीच्या प्रादुर्भावाखाली आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत या बागांमध्ये किडीचा प्रादुर्भाव वाढेल आणि या बागा काढून टाकण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- नंदुरबार बाजार समितीत विक्रमी दीड लाख क्विंटल मिरची खरेदी, अडीच महिन्यात 35 कोटींची उलाढाल
- सुपरफास्ट ऊसतोड्या! कोयत्याच्या जोरावर भीमपराक्रम; एका दिवसात तब्बल 16 टन ऊस तोडला
- विद्यापीठ शेतकऱ्यांना देणार दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण, कोल्हापूरला प्रशिक्षण केंद्र उभारणार
- खतांच्या किंमतीत मोठी वाढ, पाहा कोणत्या खतांच्या किंमतीत किती झाली वाढ