Amravati Krushi Kendra : अमरावती जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा जाणवत आहे. दर्यापूर शहरात युरिया खत घेण्यासाठी सकाळी 5 वाजेपासून शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांना एकच खताचं पोत मिळत असल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे. कृषी केंद्रामध्ये खत उपलब्ध झाल्याची बातमी पसरताच सर्वांनी इकडे मोर्चा वळवला. दर्यापूर शहरातील खाजगी कृषी केंद्रामध्ये युरिया खत घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
अमरावती जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा
कित्येक दिवसांपासून दर्यापूर तालुक्यात युरिया खताचा अत्यंत तुटवडा पडला आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीकरता युरिया खत उपलब्ध होत नाही. यासंदर्भात कृषी विभागाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा कृषी विभाग झोपेचं सोंग घेत आहे, असा आरोप शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. आज शहरातील एका खाजगी कृषी केंद्रामध्ये युरिया खत उपलब्ध झाल्याची माहिती शेतकऱ्यांना होतात शेतकऱ्यांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. कृषी केंद्रावर दर्यापूर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात
जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. यामुळे चांदूरबाजार तालुक्यातील शिराळा, पुसदा, नांदुरा शेत शिवारात शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. शेतीत पेरलेल्या सोयाबीन, कपाशी, तुरीचे पीक पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही ढगफुटीमुळे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. आता सरकारकडे शेतकऱ्यांनी मदतीची मागणी यावेळी केली जात आहे.
विदर्भातील शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत
पश्चिम विदर्भात पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण झाली आहे. गेल्या वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे खरिपावर शेतकऱ्यांची भिस्त होती. यंदा पश्चिम विदर्भात 85 टक्के शेतकऱ्यांना 2 कोटी 29 लाख रुपये कर्जवाटप करण्यात आलं. मात्र, जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे आतापर्यंत पश्चिम विदर्भातील 49 तालुक्याला याचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील 3327 गावं बाधीत झाली आहेत. यावेळी प्राथमिक अहवालानुसार 7 लाख दोन हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. परिणामी शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. पश्चिम विदर्भात अतिशय संथगतीने पंचनामे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 73 टक्के पंचनामे झाले असून अमरावती जिख्यात मात्र केवळ 45 टक्के पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
अमरावती
नुकसान - 66 हजार 477 हेक्टर
पंचनामे - 30 हजार 100 हेक्टर
टक्केवारी - 45 टक्के