Gondia News : काही दिवसांपूर्वी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं बनावट फेसबुक अकाऊंट सुरु करुन खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला होता. तर गोंदियात (Gondia) एका तरुणाने फोटो मॉर्फ (Morph) करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या जागी आपला चेहरा लावून ते फोटो सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केले आहेत. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूर पोलिसांनी त्याला पकडलं आहे. आयएएस अधिकारी असल्याचं सांगत हा तरुण सोशल मीडियावर पोस्ट करत होता. या तरुणाने आपण मध्य प्रदेशातील नरसिंहपूरचे जिल्हाधिकारी (Narsinghpur Collector) असल्याचा दावा केला होता. त्याने पदभार स्वीकारताना फोटोही पोस्ट केला होता. त्यामुळे सध्या हे प्रकरण चर्चेत आले आहे. राहुल गिरी असे आरोपीचे नाव असून तो महाराष्ट्रातील गोंदिया इथला रहिवासी आहे. 


आपलं फोटो एडिटिंग कौशल्य वापरुन राहुल गिरी हा असं भासवण्याचा प्रयत्न करत होता की, रिजू बाफना यांच्या जागी नरसिंगपूर जिल्हाधिकारी म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. नरसिंहपूरचे जिल्हाधिकारी म्हणून असल्याचं दाखवण्याबरोबरच राहुल गिरीने फोटो मॉर्फ करुन मध्य प्रदेशचे अतिरिक्त सचिव असल्याचा दावाही केला होता.


संबंधित तरुणाचे फोटो व्हायरल होताच त्याची माहिती नरसिंहपूरचे जिल्हाधिकारी रिजू बाफना यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी तपास केला असता तरुणाचा बनाव समोर आला. चौकशीदरम्यान, आरोपीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि इतर अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबतचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केल्याचे समोर आलं आहे. आरोपी राहुल गिरीकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनमध्ये अधिकाऱ्यांसह अनेक राजकारण्यांचे फोटोही सापडले आहेत. 


आएएस व्हायचं होतं स्वप्न होतं, पण....


दरम्यान, गोंदियातील राहुल गिरी हा एडिटिंग सॉफ्टवेअर वापरुन अधिकारी, राजकारण्यांचे सोबतचे फोटो मॉर्फ करुन तो सोशल मीडियावर पोस्ट करत असे. पण हा तरुण फोटो मॉर्फ का करत होता, याचा देखील तपासातून उलगडा झाला आहे. राहुल बीएससी पास आहे. आरोपीला आयएएस व्हायचे होते, मात्र त्याने तितके शिक्षण घेतले नव्हते. त्यामुळे तो आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी फोटो एडिट करुन आयएएस झाल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत होता.


दरम्यान, जबलपूर पोलीस राहुल गिरी यांच्या फेक सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीबद्दल कसून चौकशी करत आहेत. तसंच अशाप्रकारे फोटो मॉर्फ करुन त्याने काही अवाजवी फायदे मिळवले आहेत की नाही हे देखील तपासत आहेत.


हेही वाचा


Gondia News : जंगली डुक्कराच्या शिकारीसाठी लावला होता विद्युत करंट अन् घडलं भलतंच....