Agriculture News in Sangli : सांगली (Sangli) जिल्ह्यात दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर गुरुवारी सायंकाळी जोरदार अवकाळी पावसानं (Rain) हजेरी लावली. मिरज तालुक्यासह चार तालुक्यांमध्ये पाऊस झाला. या अवकाळी  पावसामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी (Grape grower farmer) चिंतेत आहेत. कारण पावसाचा फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष बागांना तडाखा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर अन्य पिकांसाठी देखील हा पाऊस धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.


हरभऱ्यावरही घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता


सांगलीसह मिरज परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. पाऊस तुषार स्वरुपात पडला असला तरी फुलोऱ्याच्या स्थितीत असणाऱ्या द्राक्ष बागांना धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून सांगली जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे. बुधवारी तर दिवसभर सुर्यदर्शन झाले नाही. ढगाळ हवामानामुळं थंडी गायब झाली आहे. जिल्ह्याचे तपमान किमान 22 तर कमाल 32 सेल्सियस आहे. आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाऊस तुषार स्वरुपात झाला. यामुळं फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष घडात पाणी साचून दावण्या रोगाचा धोका वाढला आहे. द्राक्षबरोबरच अन्य पिकांनाही या अवकाळी पावसानं धोका निर्माण झाला आहे. या पावसामुळं हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तरी ज्वारीला हलका पाऊस आणि ढगाळ हवामान लाभदायी ठरणार आहे.


या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी


सांगली जिल्ह्यात गुरुवारी रात्री सांगलीसह मिरज कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा निर्यातक्षम द्राक्ष बागांना सर्वाधिक फटका बसणार असल्यामुळं शेतकरी चिंतित आहेत. द्राक्ष बागांच्या छाटणी वेळीही अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्यांनी अनेक प्रयत्नांतून द्राक्षबागा वाचवल्या आहेत. तोपर्यंत गुरुवारी रात्री साडेसात वाजल्यानंतर जवळपास अर्धातास सांगली, मिरज शहरांसह कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. 


शेतात पाणी साचल्यानं ऊसतोडी रखडल्या


काल रात्री झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतात पाणी साचल्यानं ऊसतोडी रखडल्या आहेत. सध्या ऊसाचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. मात्र, पावसामुळं ऊस तोडण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तर दुसरीकडं ऐन फुलोऱ्यात आलेल्या द्राक्ष बागांच्या हंगामालाही फटका बसणार आहे. जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांचीही चांगलीच तारांबळ उडाली. कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी, कोंगनोळी, करोली टी, शिंदेवाडी, म्हैसाळ एम. परिसरात सुमारे अर्धा तास पावसाने हजेरी लावली. 


महत्त्वाच्या बातम्या:


Bhandara News : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतकरी संतप्त, महिनाभरापूर्वी कापलेलं धान पडून