China Corona Updates : चीनमध्ये ( China ) पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. चीनमधील झेंग्झौ शहरामध्ये ( Zhengzhou ) आयफोनचा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे, म्हणून झेंग्झौ शहराला आयफोन सिटी असंही म्हणतात. प्रशासनाने या शहरात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये येथील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. यानंतर प्रशासनाने या शहरामध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये गुरुवारी दिवसभरात 32,943 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. बुधवारी चीनमध्ये 31,454 नवीन रुग्णांची नोंद झाली होती.


दरम्यान, बुधवारी फॉक्सकॉन कारखान्यात हिंसक प्रदर्शनंही करण्यात आली होती. यावेळी पोलीस आणि हजारो कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. वेतन न मिळाल्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. एकीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यात अशी निदर्शनं यामुळे प्रशासन संकटात सापडलं आहे.


चीनमध्ये एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद


चीनमध्ये झेंग्झौमध्ये शहरासोबतच अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. चीन प्रशासनाने पुन्हा एकदा झिरो कोविड धोरणाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. अनेक शहरामध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बुधवारी चीनमध्ये 31,454 नवीन रुग्णांची नोंद झाली होती, यामध्ये 27,517 रुग्णांमध्ये लक्षणे नव्हती.


अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन


एकीकडे चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांत विक्रमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात सुमारे 31 हजार रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाच दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. शुक्रवारपासून ते मंगळवारपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. झेंग्झौ शहर प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा. चीनमध्ये अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अनेक शाळा, शॉपिंग मॉल्स बंद ठेवण्यात आले आहेत. तर सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी कोरोना चाचणीचा अहवाल असणं अनिवार्य आहे.  


आयफोन सिटी झेंग्झौमध्ये लॉकडाऊन


मीडिया रिपोर्टनुसार, फॉक्सकॉन आयफोन फॅक्टरीमध्ये बुधवारी कर्मचाऱ्यांनी वेतन न मिळाल्यामुळे आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. तणाव शांत करण्यासाठी आलेले पोलीस आणि कर्मचारी यांच्यातही जुंपली पाहायला मिळाली. या हिंसाचारामुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी हा तणाव शांत केला. फॉक्सकॉन कंपनीने निवेदन जारी करत म्हटलं आहे की, तांत्रित त्रुटीमुळे कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्यात अडचणी आल्या, याबाबत आम्ही दिलगिर आहोत. कंपनी ही समस्या लवकरात लवकर दूर करेल.