Maharashtra Rain Update : राज्यात (Maharashtra) अवकाळी पावसाने (Rain Alert) हजेरी लावली आहे. सकाळी हवेत गारवा आणि दिवसा उकाडा अशा वातावरणात मधचे पावसाने हजेरी लावताना दिसत आहे. राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात गेले दोन ते तीन दिवस पावसानं हजेरी लावली आहे. सिंधुदुर्गात परतीच्या पावसामुळे भात शेतीचे नुकसान झाल आहे. ऐन भात कापणीच्या मोसमात पावसामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.
ढगाळ वातावरण, पावसाच्या हलक्या सरी
मागील काही दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढली होती. मंगळवार पासून लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिवसभर होते. बुधवारी रात्री ही पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली होती. गुरुवारी सकाळपासून सर्वत्र थंडीचा वाढलेला जोर दिसून आला आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारी, कासार शिर्शी, लातूर शहर, लातूर ग्रामीण, औसा, उदगीर या भागात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणात अचानक गारवा वाढला आहे. ढगाळ वातावरण पावसाच्या हलक्या सरी आणि थंड वारा याचा परिणाम पिकांवर होताना दिसत आहे.
मान्सून सदृश्य वातावरण
बेळगावात बुधवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून मान्सून सदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी आकाशात ढग दाटून आले होते, त्यामुळे सकाळी सूर्यदर्शन झालंच नाही. प्रारंभी काही वेळ पावसाचे थेंब पडण्यास सुरुवात झाली. अर्ध्या तासाहून अधिक काळ पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. त्यानंतर, मात्र ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि आकाश अंधारून आले. लगेच पावसाला जोरदार सुरुवात झाली. दीड तासाहून अधिक काळ अवकाळी पाऊस सुरू होता. सकाळी शाळा, कॉलेजला जायची वेळ असल्याने विद्यार्थ्यांची मात्र तारांबळ उडाली. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साठल्याचे पाहायला मिळाले. सध्या भात पिकाची कापणी सुरू झाली आहे. भात कापून शेतात ठेवलेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे. अद्याप शेतात असलेल्या भातपिकाचे भात पावसामुळे झडून गेल्याने शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागणार आहे.
फुलोऱ्यात आलेल्या द्राक्ष बागांना धोका
सांगली जिल्ह्यातील शिराळा, जत, पलूस, तासगाव, खानापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. दिवाळीत थंडी सुरू होण्याची अपेक्षा असताना पावसाचे आगमन छाटणी झालेल्या आणि फुलोऱ्यात आलेल्या द्राक्ष बागांना धोका ठरणारे आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ हवामान असून काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. शिराळा तालुक्यातील मांगले परिसरात पहाटे पासून पाऊस सुरु होता. तासगाव, पलूस, खानापूर, जत भागात पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास हलका पाऊस पडला. द्राक्षाच्या फळछाटण्या झाल्या असून सध्या द्राक्ष घड कळी, फुलोऱ्याच्या स्थितीत असून यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने बुरशीजन्य दावण्या रोगाचा प्रादुर्भाव बळावण्याची शक्यता आहे.
वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस
सांगली जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पलूस तालुक्यात अंकलखोप या गावी रात्रीसह पहाटे वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडला. तर जिल्हाभर ढगाळ वातावरण आहे. यामुळे पलूस सह खानापूर, जत,या भागात पाऊसच्या सरी कोसळत आहेत. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे ऊस शेतामध्येच अडकून पडणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्याचबरोबर द्राक्ष बागायतदारांना सुद्धा या पावसाचा जबरदस्त फटका बसणार आहे. आजही वातावरण ढगाळ असल्याने पाऊसाची शक्यता आहे मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे मात्र द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता संकटात सापडला आहे.