Purandar figs : अतिवृष्टीमुळे यंदा (Fig) सिताफळ, अंजिराच्या अनेक बागा नष्ट झाल्या, मात्र पुरंदर तालुक्यातील दिवे येथील शेतकरी दत्तात्रय झेंडे आणि निलेश झेंडे यांनी त्यांची अंजिराची बाग वाचवली. विशेष म्हणजे आता त्यांच्या अंजिराला सोन्याचा भावदेखील मिळत आहे.


पुरंदर तालुका हा सीताफळ आणि अजिंरासाठी प्रसिद्ध आहे. मात्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंजिराच्या बागा उध्वस्त झाल्या होत्या. पावसामुळे अंजिराच्या बागेवर करपा आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं. अशा प्रतिकूल परिस्थितीतही पुरंदर तालुक्यातील दिवे येथील शेतकरी दत्तात्रय झेंडे आणि निलेश झेंडे यांनी बाग वाचवली. त्यांच्या अंजिराला योग्य भावही मिळत आहे आणि पंचक्रोशीत चर्चादेखील होत आहे. 


जागतिक बाजारपेठेमध्ये पुरंदरच्या अंजिराला मिळालेले स्थान पाहता पुरंदरच्या अंजिर शेतकऱ्यांचे सध्या सुगीचे दिवस सुरू आहेत. पुरंदरमधील दिवे येथील शेतकरी दत्तात्रय झेंडे आणि निलेश झेंडे यांनी त्यांच्या एकूण 100 अंजिरांच्या झाडांमधून चांगले उत्पादन मिळत आहे. सध्या झेंडे यांची दीड एकरावर अंजिराची बाग आहे.  एक महिन्यापासून अंजिराच्या काढणीला सुरुवात झाली असून यातून  निव्वळ 7 लाख रुपये नफा मिळेल, असा शेतकरी अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.


शेती ते बाजार अंजिराचा प्रवास कसा होतो?
दत्तातत्र्य  झेंडे यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतल आहे. नोकरीच्या मागे न लागता त्यांनी आंजिर शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे भाऊ निलेश झेंडे आणि कुटुंबातील सर्व सदस्य आंजिरच्या शेतात काम करतात. यातून चांगला नफा मिळत आहे. शेतीचं बऱ्यापैकी ज्ञान असल्याने औषध आणि  खते यांचं ते योग्य नियोजन करतात. अंजिराचे उत्पादन घेताना त्याचे पॅकेजिंगची सर्व जबाबदारी महिला सांभाळतात. पुरंदर या ब्रँडिंग खाली झेंडे यांची अंजीर थेट मुंबईच्या बाजारात पाठवले जातात.


अंजिरला सोन्याचे दिवस
पुरंदर तालुक्‍यातील दिवे, सोनोरी, वाघापूर, राजेवाडी, गुऱ्होळी तसेच इतर भागातही अंजिराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. मात्र झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. अंजीर पिकाची काढणी सुरू आहे. सध्या बाजार भाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक नफा मिळत आहे. अंजिराच्या एका पेटीमध्ये बारा फळे तर चार पेट्या मिळून एक बॉक्‍स तयार होतो. या चार बॉक्स मिळून एक जोठा तयार होतो. याची वर्गवारी ही 3 विभागात केली जाते. मोठी साईजला एका जोठ्यात 48 अंजीर 300 ते 350 रुपये,  छोटी साईज मध्ये 60 अंजीर 200 ते 220 रुपयाला विक्री होते तर उकल 48 अंजीर 180 पर्यत भाव मिळतो आहे. बाजारपेठांमध्ये पुरंदरच्या अंजिराला विशेष मागणी असल्याने जवळपास 300 ते 350 रुपये प्रति जोठा दर मिळतो. एका जोठ्यात 4 डझन अंजीर असतात, असं शेतकरी निलेश झेंडे सांगतात. 


एकेकाळी दुष्काळी असलेला पुरंदर तालुका आता अंजीर आणि इतर फळबागांच्या जोरावर समृद्धीच्या मार्गावर चालला आहे. सध्या अंजिराला चांगला भाव मिळत असल्याने झेंडे कुटुंबतील लोक आनंदी आहेत. अतिवृष्टीत अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालं मात्र या अतिवृष्टीवर मात करून झेंडे यांनी ही अंजिराची बाग वाचवली.