Maharashtra Karnataka Border Dispute : बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ आज कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. परंतु, हा हल्ला करण्यासाठी कन्नड रक्षण वेदिका संघटनेला काँग्रेसची फूस असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (keshav upadhye ) यांनी केलाय. केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केलीय.  
 
बेळगावमध्ये महाराष्ट्रातील सहा ट्रकवर आज दगडफेक करण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी सहा ट्रकवर शाईफेक आणि दगडफेक केली. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक संघटना आणि विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या हल्ल्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राच्या वाहनांवरील हल्ले 24 तासात थांबले नाहीत तर वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा शरद पवार यांनी दिलाय. मात्रस हा हल्ला करणाऱ्या कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसची फूस असल्याचा आरोप उपाध्ये यांनी केलाय. 


"आज बेळगाव सीमाभागात महाराष्ट्रातील गाड्यांवर कन्नड वेदिका संघटनेने हल्ला केला, या हल्ल्याचा निषेध करतो. हा हल्ला करणाऱ्या कन्नड वेदिका संघटनेला काँग्रेस आणि जेडीएस या दोन पक्षांची फूस आहे. पुढच्या काळात काँग्रेसला फायदा मिळावा यासाठी अशा पद्धतीने आंदोलने केली जात आहेत, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केलाय.


दरम्यान, केशव  उपाध्ये यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केलीय. सत्तेत असताना सीमा वादावरून उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली होती आणि सत्ता गेल्यानंतर आज वेगळी भूमिका घेत आहेत असा आरोप उपाध्ये यांनी केलाय. "महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद न्यायालयात असून जो पर्यंत हा वाद मिटत नाही तोपर्यंत हा भाग केंद्रशाशीत करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केली होती. सत्तेत असताना तो भाग केंद्र सरकारला द्ययला तयार असणारे उद्धव ठाकरे आता हा वाद मिटवण्यासाठी पुन्हा सत्ता मागत आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांनी कोणतीच जबाबदारी घेतली नाही. फक्त आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली, अशी टीका केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलीय.  


उपाध्ये यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरच्या मोर्चावर देखील टीका केली. सत्ता गेल्याने त्यांची अवस्था वैफल्यग्रस्त झाली आहे. त्यामुळे ते हा मोर्चा काढत आहेत. या मोर्चाला काही अर्थ नाही. वैफल्यग्रस्तांचा मोर्चा म्हणून या मोर्चाकडं पाहवं लागेल, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केलीय.  


महत्वाच्या बातम्या


सीमा भागातील वाहनांवरील हल्ले 24 तासांत थांबले नाहीत तर वेगळी भूमिका घेऊ; शरद पवारांचा इशारा