Wheat News : देशातील गव्हाचा पुरवठा, साठा आणि निर्यात यासंदर्भातील महत्वाच्या मुद्यांचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठक झाली. या बैठकीत गव्हाच्या संदर्भात पंतप्रधानांसमोर सविस्तर सादरीकरण करण्यात आले. मार्च-एप्रिल 2022 या महिन्यांतील उच्च तापमानाचा पिकाच्या उत्पादनावर होणाऱ्या परिणामाबाबत त्यांना माहिती देण्यात आली. गव्हाची खरेदी आणि निर्यातीच्या स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे.


जागतिक बाजारपेठेत सध्या भारतातील कृषी उत्पादनांना मागणी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, भारत अन्नधान्य आणि इतर कृषी उत्पादनांचा खात्रीशीर स्त्रोत म्हणून विकसित व्हावा, यादृष्टीने दर्जेदार मापदंड आणि मानके सुनिश्चित करण्यासाठी सर्वप्रकारची पावले उचलण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत सुनिश्चित  करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेल्या प्रचलित बाजारभावाबाबतही पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. या बैठकीला पंतप्रधानांचे प्रधान सचिव, सल्लागार, कॅबिनेट सचिव, अन्न आणि सार्वजनिक वितरण प्रणाली आणि कृषी विभागाचे सचिव उपस्थित होते.




दरम्यान, भारतात यावर्षी गव्हाचा मोठ्या प्रमाणावर अतिरीक्त साठा आहे. देशाला वर्षभर पुरेल एवढा गहू आपल्याकडे आहे. अशातच बाजारपेठेत सध्या गव्हाला चांगला दर मिळत असल्याची माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे  सचिव सुधांशू पांडे यांनी दिली होती. पुढील वर्षात योजनांची गरज पूर्ण केल्यानंतर 1 एप्रिल 2023 रोजी भारताकडे 80 लाख मेट्रीक टन गव्हाचा साठा  शिल्लक असेल. जो किमान 75 लाख मेट्रीक टन गरजेपेक्षा जास्त असल्याचे पांडे यांनी सांगितले होते. यावर्षी 1 हजार 50 लाख मेट्रीक टन गव्हाचे उत्पादन अपेक्षित आहे.


केंद्र सरकार सध्या गव्हाची निर्यात करत आहे. गहू निर्यात रोखण्यासाठी सरकारने कोणतेही पाऊल उचलले नसल्याची माहिती देखील सुधांशू पांडे यांनी दिली. आत्तापर्यंत 40 LMT गहू निर्यातीसाठी करारबद्ध झाला आहे. एप्रिल 2022 मध्ये सुमारे 11 LMT गहू निर्यात करण्यात आला आहे. इजिप्त आणि तुर्कीने देखील भारतीय गहू आयात करण्यास मान्यता दिली होती. जूनपासून अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलियातील गहू आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गहू विकण्याची हीच योग्य वेळ असल्याची माहिती पांडे यांनी दिली होती.


मार्च आणि एप्रिलमध्ये उन्हाचा तडाखा जोरदार होता. याचा पिकाच्या उत्पादनावर परिणाम देखील झाला आहे. यासंबंधीची माहिती देखील अधिकाऱ्यांनी पंतप्रधांन मोदींना दिली. तसेच गव्हाची खरेदी आणि निर्यात याचा आढावा देखील त्यांनी घेतला. कृषी मालाच्या दर्जाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. 


महत्वाच्या बातम्या: