Sambhaji Raje Chhatrapati News : संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपला.  संभाजीराजे पुढे काय करणार असा सवाल उपस्थित होत असताना आता खुद्द त्यांनीच राजकीय भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 3 मे रोजी खासदार पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर माझी दिशा जाहीर करणार असे माजी खासदार  संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले होते. त्यानंतर सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिले होते. त्यावर माजी खासदार संभाजीराजे यांनी आपली भूमिका 12 मे रोजी पुण्यातून स्पष्ट करणार असे जाहीर केले आहे. येत्या 12 मे रोजी माझी भूमिका जाहीर करणार आहे. संभाजीराजे कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार की! स्वतःचे अस्तित्व राज्यात निर्माण करणार हे पाहणे महत्वाचे आहे. 


दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पक्षात घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमध्ये यावे त्यांचे स्वागत करू, असे जाहीरपाने सांगितले आहे. तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभाजीराजे यांचे स्वागत करू असे म्हणाले आहेत. मात्र आता संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घरणार हे येत्या 12 मे रोजी कळणार आहे.


राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, राजकारणात उतरायचंय ते आता निश्चित आहे. पुढे काय करायचं हे माझ्या डोक्यात ठरलेलं आहे, फक्त ते जाहीर नंतर करणार, असं संभाजीराजे म्हणाले होते.  


दिल्लीचे राजकारण करणार की महाराष्ट्राचे राजकारण या प्रश्नावर संभाजीराजे म्हणाले होते की, "दोन्ही मला आवडतं. राजकारणात आता उतरायचंय हे आता निश्चित आहे. मग दिल्ली असो किंवा महाराष्ट्र असो, दोन्हीत मी रमतो. दोन्हीकडे माझे संपर्क वाढलेले आहेत. महाराष्ट्र माझ्याकडे बघतो की शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांचे विचार घेऊन दिल्लीत जायला पाहिजे. तर दिल्लीतल्या लोकांची इच्छा आहे शिवाजी महाराज, शाहूंचा वंशज इथे आला आहे, इथे त्याची ताकद वाढायला हवीय. दोन्ही अँगल आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन्हीच्या माध्यमातून मी राजकारणात सक्रिय होणार आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. 


संबंधित इतर बातम्या


राजकारणात उतरायचं हे आता निश्चित, पुढील भूमिका लवकरच जाहीर करणार : संभाजीराजे छत्रपती


Sambhaji Raje : रायगडावरील शिवरायांची समाधी लोकमान्य टिळक यांच्याकडून बांधली गेली नाही : संभाजीराजे छत्रपती