Palghar Strawberry : पालघर जिल्ह्यातील काही भाग अजूनही दुर्लक्षीत आहे. जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड डहाणू, तलासरी या भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. मात्र, अनेक समस्यांवर मात करुन येथील शेतकरी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी करताना दिसत आहेत. पारंपारिक भात शेती आणि नाचणी पिकांना बगल देत आता जव्हार आणि मोखाडा येथील शेतकरी पर्यायी लागवडीकडे वळताना दिसत आहे. पाचगणी, महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी उत्पादीत होणाऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड आता जव्हार आणि मोखाडा भागातील शेतकरी करत आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची आर्थिक घडी मजबूत होण्यास मदत होणार आहे. 


मोखाडा तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी भगीरथ भुसारा हे पूर्वी पारंपरिक शेती करायचे. मात्र, या उत्पादनातून फक्त प्राथमिक गरजा भागात होत्या. म्हणून त्यांना सतत रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागायचे. मात्र, त्यानंतर त्यांनी चार वर्षांपूर्वी कृषी विभागाच्या योजना प्राप्त करण्याकडे भर दिला. पहिल्यांदा भुसारा यांनी मोगरा लागवड करून उत्पादन घ्यायला सुरुवात केली. मात्र, गेल्या वर्षापासून कृषी विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचे धडे घेतले. हाच प्रयोग त्यांनी आपल्या साडेपाच एकर असलेल्या माळरान शेतीत मोगरा लागवडीबरोबरच स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला. सध्याच्या घडीला त्यांना या स्ट्रॉबेरी उत्पादनातून  चांगला फायदा होत आहे. स्ट्रॉबेरीला चांगली बाजारपेठ प्राप्त झाली असून, यातून भुसारा यांना एका सिझनमध्ये खर्च वजा करता साधारणता अडीच लाखाचा नफा होईल अशी आशा आहे.


स्थलांतर कमी होण्यास मदत


जव्हार आणि मोखाडा येथील आदिवासी समाजातील बहुतेक नागरिक हे पावसाळ्यानंतर रोजगारासाठी स्थलांतर करतात. हाताला काम नसल्याने येथील गावच्या गाव रोजगारासाठी शहरांकडे जात असून, हेच स्थलांतर रोखण्यासाठी कृषी विभागाकडून अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी मिळणारे स्ट्रॉबेरी आता जव्हार, मोखाडामध्ये सहज उपलब्ध होते. जव्हार आणि मोखाडा येथील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केल्यामुळे येथील रोजगार वाढून स्थलांतर संपुष्टात येण्यास मदत होईल, अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येतेय.


जव्हार आणि मोखाडा ची ओळख हे मिनी महाबळेश्वर अशी असून, याठिकाणी वातावरण हे जानेवारीच्या अखेरपर्यंत अतिथंड असते. येथील स्थलांतरण आणि बेरोजगारी लक्षात घेऊन कृषी विभागाकडून या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीच्या लागवडीचे प्रशिक्षण दिले. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला स्ट्रॉबेरीची रोपे देण्यात आली आहेत. प्रायोगिक तत्त्वावर ही लागवड करण्यात आली असून, इतर ठिकाणी रासायनिक खतांचा वापर जास्त होतो. मात्र या भागात सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतले जाते.  त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना उत्पन्नही चांगले मिळाले. सध्या ही लागवड व्यावसायिक दृष्टीने केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.


गेल्या दोन वर्षापासून जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड या भागात कृषी विभागाकडून योजनांची चांगली अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे शेतीतील हे प्रयोग यशस्वी होत आहेत. यामुळे सध्या स्थलांतराच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे या भागातील शिक्षण, आरोग्य आणि कुपोषण या समस्याही मिटण्यास मदत होईल. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आपल्या शेतीकडे  लक्ष देऊन योजनांचा लाभ घ्यावा. आपल्या शेतीमधून चांगले उत्पादन घेऊन प्रगती करावी असं आवाहन आमदार सुनील भुसारा यांनी केले आहे. जव्हार आणि मोखाडा भागातील स्थलांतरण रोखण्यास शासनाला मागील अनेक वर्षांपासून अपयश येताना पाहायला मिळत आहे. मात्र, आता या शेतकऱ्यांना आपल्या शेतीतच रोजगार उपलब्ध होणार असल्याने हे स्थलांतरण रोखून येथील बेरोजगारीही संपुष्टात येईल असे चित्र दिसत आहे.


महत्त्वाच्या बतम्या:



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा