Yogi Adityanath UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान काल पार पडले आहे. दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी मतदान झाले. त्यानंतर आता या जागांवर विजयाबाबत सर्वच नेत्यांनी आपापले दावे केले आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दोन्ही टप्प्यात जनतेचा आम्हाला पूर्ण पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तर योगी आदित्यनाथ यांनी सुरक्षेचा उल्लेख करून जनतेचे आभार मानले आहेत. दरम्यान, दोन्ही टप्प्यात समाजवादी पार्टीने जागा दिंकण्याचे शतक पूर्ण केल्याचा दावा देखील अखिलेश यांनी केला आहे.  


दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच अखिलेश यादव यांनी ट्विटरवर जनतेचे आभार मानले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील जनतेचा पाठिंबा पाहता सपा आघाडीने जागा जिंकण्याचे शतक पूर्ण केल्याचा दावा अखिलेश यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले.  दोन्ही टप्प्यात मिळालेल्या जनतेच्या 100 टक्के पाठिंब्याबद्दल त्यांनी जनेतेचे आभार मानत जनता भाजपला परत जा, असे सांगत असल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
 
दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनीही ट्वीट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, लोकशाहीच्या महायज्ञात सर्वांनी मतदानाा हक्क बजावल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानलेत. निवडणुकीतील तुमचा उत्साह तुमची जागरूकता दर्शवत आहे. तुमचे मत उत्तर प्रदेशातील सुरक्षेसाठी आणि समृद्धीच्या प्रवासाला नवी गती देईल असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.


यूपीमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान लोकांचा दृष्टिकोन संमिश्र होता. मतदानासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले नाहीत, मात्र, सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी 60 टक्क्यांच्या पुढे गेली. यूपीमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 60.44 टक्के मतदान झाले आहे. अद्यापपर्यंत निवडणूक आयोगाने मतदानाची अंतीम आकडेवारी जाहीर केलेली नाही. या टप्प्यात मतदानाची टक्केवारी 64 टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.


सोमवारी उत्तर प्रदेशमधील दुसऱ्या टप्प्यातील तर उत्तराखंड आणि गोव्यातील सर्व विधानसभा जागांसाठी मतदान झाले. तिन्ही राज्यात मिळून आज एकूण 165 जागांसाठी मतदान झाले. यासाठी 1 हजार 519 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यूपीमधील 55 विधानसभा जागांसाठी 586 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते तर उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी 632 आणि गोव्यातील 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात होते. 
 


महत्त्वाच्या बातम्या: