Cotton News : राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कापसाचे (Cotton) उत्पादन घेतलं जातं. यावर्षी देखील राज्यात मोठ्या क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, कापूस उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत. सुरुवातील अतिवृष्टीचा फटका आणि आता कापसावर होत असलेला रोगांचा प्रादुर्भाव यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते. मात्र, आता कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळं कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.


नंदूरबार जिल्ह्यात एक लाख 25 हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड


जळगाव, धुळे, नंदूरबार हे जिल्हे सर्वात मोठा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा बेल्ट म्हणून ओळखले जातात. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कापसाचे उत्पादन घेतलं जाते. मात्र, नंदूरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. कारण कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. मागच्या वर्षी कापसाला मिळालेल्या विक्रमी दरानंतर नंदूरबार जिल्ह्यात कापसाच्या क्षेत्रात प्रचंड वाढ झाली होती. यावर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील एक लाख 25 हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. कापसाला मिळालेला चांगला भाव यावर्षी कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. नंदूरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कापसाची पाने लाल पडून गळत आहेत. पर्यायाने झाडाचे पोषण खुटत आहे.त्याचा परिणाम झाडाच्या वाढीवर आणि उत्पादनावर होत असतो. एकूण यावर्षी वेळेवर झालेला पाऊस आणि पोषक वातावरणामुळं कापसाचे उत्पादन चांगले येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.


कापसाला यावर्षी दहा हजारांच्या वर दर मिळण्याची शक्यता


नंदूरबार जिल्ह्यातील पंधरा ते वीस हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारनं लाल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. तसेच शेतकऱ्यांना सरसकट एकरी मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून  केली जात आहे. कापसाच्या पिकाला यावर्षीही दहा हजारांच्या वर दर मिळत आहे. मात्र, लाल्या रोगामुळं उत्पादन कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांची अवस्था  कभी खुशी कभी गम अशी झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: