Chhagan Bhujbal News : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आता त्यांच्या विरोधात चेंबूर येथील एका व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्याने गुन्हा दाखल केला आहे. छगन भुजबळ यांच्यासह अन्य दोघांविरोधात धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 ललितकुमार टेकचंदानी 49 यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (२) (धमकी देणे) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  टेकचंदानी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, त्यांनी छगन भुजबळ यांना त्यांच्या मोबाईलवर दोन व्हिडिओ पाठवले होते. ज्यात भुजबळांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे भाषण केले होते.  व्हिडिओ पाठवल्यानंतर लगेचच टेकचंदानी यांना धमक्या देणारे व्हॉट्सअॅप कॉल्स आणि मेसेज येऊ लागले. ज्यात त्यांना शिवीगाळ सुद्धा घेण्यात आली आहे. 


'तू भुजबळ साहेबांना संदेश पाठवतो, तुझा घरी येऊन गोळ्या टाकतो. मी दुबईची लोकं लावतो, भुजबळ साहेबांना मेसेज करणं महागात पडेल', अशा शब्दात टेकचंदानी यांना धमक्या देण्यात आल्या असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. 


दरम्यान, टेकचंदानी यांना हे संदेश आणि कॉल कुणी केले यांचा पोलीस तपास करत आहे. टेकचंदानी यांनी त्याला आलेल्या मोबाईल नंबरची माहिती पोलिसांना दिली असून पोलीस पुढील तपास करत आहे.


खासदार राहुल शेवाळे यांचं ट्वीट


खासदार राहुल शेवाळे यांनी देखील या प्रकरणी भाष्य केलं आहे. त्यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, चेंबूरचे व्यापारी ललित टेकचंदानी यांना दिलेल्या धमकीमागे कोण आहे? या धमकीला माजी मंत्र्यांचे समर्थन आहे काय?अखेर ही धमकी कुणाच्या इशाऱ्यावर दिली गेली? या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेसमोर यायला हवीत.  या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.


काय म्हणाले होते छगन भुजबळ


'शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजेत. कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु, सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. त्यांची पूजा कशासाठी करायची?, असे वादग्रस्त वक्तव्य भुजबळ यांनी केले होते. महापुरुषांमुळे तुम्हा आम्हाला शिक्षण मिळालं, त्यांची पूजा करायला हवी..यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे', असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. सरस्वती विषयाचं  राजकारण का केलं जातंय? मी देखील हिंदूच आहे, असं भुजबळांनी नंतर  स्पष्टीकरण  दिलं होतं. 



 


इतर महत्वाच्या बातम्या


Chhagan Bhujbal : सरस्वती विषयाच राजकारण का केलं जातंय? मी देखील हिंदूच, भुजबळांचं स्पष्टीकरण 


CM Eknath Shinde : सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही, कोणाला काय वाटेल ते करणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे