Onion Rate Issue :  गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात कमालीची घसरण होत असल्याने बळीराजाच्या हाती काही मिळत नाही. पैठणच्या बाजार समितीत कांद्याला 100 रुपये क्विंटल हा नीचांकी भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.  बाजारभाव वाढण्यासाठी तसेच निर्यातीला चालना मिळण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ पाऊलं उचलणं गरजेचं असल्याचं मत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी व्यक्त केलं आहे.  गेल्या दोन वर्षांपासून निर्यातीसंदर्भात केंद्राने घेतलेल्या निर्णयाचा निर्यातीवर मोठा परिणाम झालाय. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये देखिल मोठ्या प्रमाणावर कांदा तयार होत असून त्याची निर्यातही होत असल्याने त्यांनी भारताची बाजारपेठ काबीज केली आहे. निर्यातीला चालना मिळण्यासाठी केंद्राने 10 टक्के अनुदान देणे अपेक्षित असतांना आता ते फक्त २ टक्के दिले जाते आहे. विशेष म्हणजे ट्रान्सपोर्ट खर्च कमी लागत असल्याने मध्यप्रदेशच्याही कांद्याची निर्यात चांगली होत असल्याचं होळकर यांनी म्हटलं आहे.


पैठणच्या बाजार समितीत कांद्याला निचांकी 100 रुपये क्विंटलचा भाव


पैठणच्या बाजार समितीत कांद्याला 100 रुपये क्विंटल हा नीचांकी भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले. गेल्या पाच वर्षांनंतर पुन्हा कांदा 100 रुपये क्विंटलवर आला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गत पंधरा दिवसांपासून  आवक सतत वाढत असून वाढत्या आवक झाल्यामुळे कांद्याच्या भावावर परिणाम झाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नितीन विखे यांनी दिली. पैठण बाजार समितीत इतर ठिकाणांहूनदेखील कांद्याची आवक सुरू आहे. कांद्याला तीन दिवसांपूर्वी 200 ते 900 रुपये भाव मिळाला होता. मात्र सततची वाढती आवक यामुळे कांद्याला 240 वरून थेट दोन दिवसांत 100 रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे.


पैठण बाजार समितीमध्ये पैठण तालुक्यातील व इतर ठिकाणांहून देखील आवक होत आहे. कांद्याला तीन दिवसांपूर्वी 200 रुपये ते 900 रुपयांचा भाव मिळाला होता. आज मात्र कांद्याला शंभर रुपये क्विंटलची लिलावात बोली लागली. हा भाव म्हणजे 1 रुपये किलोप्रमाणे कांदा गेला. यात कांद्याच्या लागवडीसाठी जो पैसा लागला तोही निघाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी पैठण तालुक्यातून अडीच हजार कांद्याच्या गोण्या लिलावासाठी बाजार समितीत आल्या. रोजच्या तुलनेत शुक्रवारी कमी कांदा आला तरीही भाव कमी मिळाला असल्याचे दिसले.