Flower Farmers News : यावर्षीचा नवरात्री उत्सव (Navratri Festival) 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत होणार आहे. नवरात्रीचे 9 दिवस देवीच्या 9 वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. पितृपक्ष संपताच शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. या नवरात्र उत्सवात फुलांना मोठी मागणी असते. त्या दृष्टीनं फुल उत्पादक शेतकरी (Flower farmers) दरवर्षी नियोजन करत असतात. दरम्यान, नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर शेतकरी फुलांचे उत्पादन घेतात. नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मळे फुलांनी फुलले आहेत. 


नंदूरबार आणि नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन घेतलं जातं


नंदूरबार जिल्ह्यातील नंदूरबार आणि नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात झेंडू आणि इतर फुलांचे उत्पादन घेतले जाते. नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यंत फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावर्षी नवरात्र उत्सव महाराष्ट्रात आणि देशभरात निर्बंधमुक्त साजरा होणार असल्यानं फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यातील फुले गुजरात राज्यातील मोठ्या शहरातील बाजारपेठांमध्ये जातात. नवरात्र उत्सव सुरु होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असल्यानं मोठ्या प्रमाणात व्यापारी फुल खरेदीसाठी नंदूरबार जिल्ह्यात दाखल झाले आहेत.  




व्यापाऱ्यांकडून फुलांना जागेवरच मिळतोय किलोचा  50 ते 70 रुपयांचा दर


सध्या नंदूरबार आणि नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मळे फुलांनी फुलल्याचे दिसत आहे. ही  रंगीबेरंगी फुलं रस्त्याने जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून जागेवर 50 ते 70 रुपये किलो दरम्यानचा दर मिळत आहे.  त्यामुळं चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केलं आहे. यावर्षी फुल उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पादन येण्याची अपेक्षा आहे.


शेतीच्या दृष्टीनं घटस्थापनेचं महत्व


घट स्थापना ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणि रब्बी पिकांचा हंगाम सुरु होण्याआधी केली जाते. ही कृषी आधारित वैज्ञानिक संकल्पना आहे. बियाणे, माती, पाणी आणि हवामानाची चिकित्सा करणारी पारंपारिक परंतू, शास्त्रीय दृष्टीकोण असणारी पद्धती आहे.  घटनस्थापना करताना प्रथम एक पळसाच्या पानाची पत्रावळी ठेवली जाते. त्यावर शेतातील काळी माती ठेवली जाते. या मातीत विविध प्रकारचे बियाणे मिसळले जाते. त्यावर एक कच्च्या मातीचा घट ठेवला जातो. या घटामध्ये नऊ दिवस रोज पाणी घातले जाते. नवव्या दिवशी तळी उचलून घटाचे विसर्जन केले जाते. त्यामुळं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं नवरात्र उत्सवाला विशेष महत्त्व आहे.


महत्त्वाच्या बातम्या: