नाशिक : एकीकडे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या घसरत्या दराने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील काही बाजारसमितीमध्ये सकाळच्या सत्रात चढ्या दराने कांदा खरेदी झाली. मात्र सायंकाळी कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत कांदा लिलाव बंद पाडले.


नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) संतप्त झाला असून मिळेल त्या भावात कांदा विक्री सुरू आहे. अशातच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने कांद्याला अनुदान जाहीर केल्यानंतर त्याचा जीआर देखील निघाला आहे. तर दुसरीकडे आज येवला तालुक्यातील अंदरसुल उपबाजार समितीत कांद्याला सकाळपासून चांगला भाव मिळाला. मात्र सायंकाळी पुन्हा भाव गडगडल्याने शेतकरी वर्ग संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट कांदा लिलाव बंद पाडले. 


नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, येवला,  बागलाण, सटाणा, निफाड आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. मात्र आता काढणी सुरू असलेला उन्हाळ कांद्यास बाजारभाव न मिळल्याने गेल्या महिनाभरात अनेक आंदोलने झाली. मात्र आंदोलने होऊनही केवळ तीनशे ते साडे तीनशे रुपये अनुदान जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी  निषेध केला आहे. अशातच मिळेल त्या भावात कांदा विक्री सुरू आहे. आज येवला तालुक्यातील अंदरसुल उपबाजार समितीत सकाळी सातशे ते आठशे रुपये भाव मिळत होता. सायंकाळी हाच भाव लाल कांद्याला 300 ते 400 तर उन्हाळ कांद्याला 400 ते 500 रुपये मिळाला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले. जवळपास तीन तास बाजार समितीचे लिलाव ठप्प होते. यानंतर व्यापारी, बाजार समिती प्रशासन व शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती.


Nashik Onion Price : अद्यापही कांद्याला न्याय नाहीच...


गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात सातत्याने घसरण होत असून यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही (Onion Production Cost) वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकावर रोटर फिरवून संताप व्यक्त करत आहेत तर अनेकजण फुकटात कांदा घेऊन जा असे आवाहन करत शेतकऱ्याची व्यथा मांडत आहेत. अशातच कांद्याला तुटपुंजे अनुदान जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांना तोंडघशी पाडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


ही बातमी वाचा :