मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांची पोलिस कोठडी आज संपत आहे. सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या गुणरत्न सदावर्ते आणि इतर आठ जणांना आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सदावर्तेंची पोलीस कोठडी वाढवून घेण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करतील मात्र जर सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी मिळाली तर त्यांचा ताबा मिळवण्यासाठी सातारा पोलीसही प्रयत्न करणार असल्याचं कळत आहे. सातारा पोलीस आज सुनावणीवेळी वॉरंट घेऊनच न्यायालयात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज न्यायालयात काय घडतं हे पाहावं लागेल.


11 तारखेच्या सुनावणीत सदावर्ते यांना पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 


अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या घरी रविवारी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झालं होतं. त्यावेळी त्यांच्या घराची झडती घेतली होती.  या ठिकाणचे सीसीटीव्ही, रजिस्टर तपासण्यात आले होते. तसेच सदावर्तेंना भेटायला कोण-कोण आलं होतं याची माहिती देखील पोलिसांनी घेतली असल्याची माहिती आहे.  


एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं होतं. आंदोलक पवारांच्या घराच्या परिसरात आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी हे थेट पवारांच्या घराच्या परिसरात शिरले आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचं समोर आलं होतं. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने पोलिसांनी ही बाब गंभीरपणे घेतली असून या प्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 



संबंधित बातम्या: