Nashik News Updates : नाशिकच्या पेठ तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांनीच 147 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 50 कोटींहून अधिकचा हा घोटाळा असल्याचा संशय आहे. या प्रकरणी 16 कृषी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक आणि इतर अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. आरोप असलेले अनेक अधिकारी आता सेवानिवृत्त आहेत. कंत्राटदार शेतकऱ्याने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
यासंदर्भात बोलताना नाशिक ग्रामिण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी म्हटलं आहे की, स्थानिक न्यायालयाच्या आदेशानंतर पेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार कृषी विभागाकडून 50 कोटींची फसवणूक झाली आहे. बोगस कागदपत्रे तयार करून कामे दाखवण्यात आले आहेत. यामधील कालावधी 2017 पर्यंत आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
पाटील यांनी सांगितलं की, या प्रकरणात सध्या 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात जशी माहिती समोर येईल तशी कारवाई करू, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे ते कृषी खात्याशी निगडीत आहे. तक्रारदाराचे म्हणणे आहे की त्यांच्याकडून ट्रॅक्टर घेण्यात आले. मात्र बोगस कामकाज करून त्यांना मोबदला देण्यात आला नाही. कामे न करताच आणि मोबदला न देता कामे दाखविण्यात आली आहे. यात इतरांची देखील फसवणूक झाल्याची शक्यता आहे आणि आकडाही वाढू शकतो, असं देखील सचिन पाटील यांनी सांगितलं आहे.
कृषी विभागात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेल्या कृषी अधिकाऱ्यांची नावं
१. नरेश शांताराम पवार, कृषी सहाय्यक, शिंदखेडा, धुळे
२. दगडू धारू पाटील, कृषी सहाय्यक, शहादा, नंदुरबार
३. संजय शामराव पाटील, कृषी सहाय्यक, धुळे
४. विठ्ठल उत्तम रंधे, कृषी सहाय्यक, एरंडगाव, येवला
५. दिपक पिराजी कुसळकर, कृषी सहाय्यक, अहमदनगर
६. दिलीप ज्ञानदेव फुलपगार, कृषी सहाय्यक, शिरूर पुणे
७. दिलीप औदुंबर वाघचौरे, कृषी पर्यवेक्षक, सोलापूर
८. मुकुंद कारभारी चौधरी, कृषी पर्यवेक्षक, राहुरी अहमदनगर
९. किरण सीताराम कडलग, कृषी पर्यवेक्षक, संगमनेर
१०. प्रतिभा यादवराव माघार, कृषी सहाय्यक, दिंडोरी नाशिक
११. राधा चिंतामण सहारे, कृषी सहाय्यक, सुरगाणा
१२. विश्वनाथ बाजीराव पाटील, मंडळ कृषी अधिकारी, पाचोरा जळगाव
१३. अशोक नारायण घरटे, मंडळ कृषी अधिकारी, साक्री धुळे
१४. एम बी महाजन, कृषी अधिकारी, पेठ
१५. सरदारसिंह उमेदसिंह राजपूत, तालुका कृषी अधिकारी, पाचोरा जळगाव
१६. शिलानाथ जगनाथ पवार, तालुका कृषी अधिकारी, कळवण नाशिक
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा
इतर महत्वाच्या बातम्या