Monsoon News : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. राज्याच्या काही भागात पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, अद्याप सर्वत्र पाऊस पडत नसल्याचे दिसत आहे. शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मान्सूनचे आगमन झाले खरे मात्र, सर्वत्र पाऊस पडत नाही. तर नेमका पाऊस का पडत नाही याची माहिती आपण पाहणार आहोत. याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. नेमकं माणिकराव खुळे काय म्हणालेत ते पाहुयात.
ढगांचे एकूण मुख्य 10 प्रकार असून, त्यांचे वर्गीकरणही पुन्हा त्यांच्या ठरलेल्या आकाशस्थित उंचीच्या पातळीनुसार 3 भागात केलेले असते, असे माणिकराव खुळे म्हणाले.
1) जमिनीपासून साधारण 6 हजार 500 फुट उंचीपर्यंतचे आणि सर्वात निम्न पातळीवरील असलेले चार प्रकारचे ढग
i) स्ट्रॅटस -करडे, पांढरे, पातळ शीट पसरल्या सारखे, कधी सर्व आकाश व्यापलेले व पर्वतीय क्षेत्रात कधी कधी तर जमिनीवरही उतरणारे व नेहमी बुरबुरीचा पाऊस देणारे ढग
ii) स्ट्रॅटोक्यूमुलस : गडद पण गोलाकार पण त्याचे शीटस्वरुप असलेले, सुरुवातीला शांत वातावरण दाखवणारे पण पाठीमागून वादळी पाऊस घेऊन येणारे ढग
iii) क्यूमुलस : पांढरे, अस्ताव्यस्त, खालून सपाट वरुन कापसाच्या गंजासारखे असणारे पण नंतरच्या 1-2 दिवसात चांगले पाऊस देऊ शकणारे ढग
iv) क्यूमुलोनिंबस : भव्य काळे, मनोऱ्यासारखे आणि नागासारखे उभे ठाकलेले, उंचीचे, शेंड्यावर बाहेर नागाचा फणा काढल्याप्रमाणं, विस्कटलेले, उष्ण, आर्द्रतायुक्त, विजांचा गडगडाटासह मोठ्या थेंबाचा पाऊस देणारे ढग
2) साधारण 6 हजार 500 ते 20 हजार फुट उंचीपर्यंतचे मध्यम पातळीतील तीन प्रकारचे ढग
i)अल्टोकुमुलस : करडे, पांढरे रंगाचे, थरात, गोलाकार, घनदाट ठश्याचे, चांगल्या आणि आल्हादायक वातावरणात असणारे ढग
ii) अल्टोस्ट्रॅटस : करड्या, निळसर थरातील, कधी तर पुर्ण आकाश व्यापलेले, व कधी तर सूर्याभोवती फिंगारलेल्या स्थितीत दिसणारे ढग तर कधी सतत, लगातार झडीचा पाऊस व पर्वतीय भागात बर्फवृष्टी व पाऊस देणारे ढग.
iii) निंबोस्ट्रॅटस : गडद, करडे, आकारहिन, पाऊस, बर्फ देणारे तसेच स्फटीकांनी भरलेले ह्यांचे थर असतात. हे तर नेहमी सूर्याला झाकतात. सतत कालावधीचा म्हणजे झडीचा पाऊस देणारे व पर्वतीय भागात बर्फ ओतणारे ढग
3) साधारण 20 हजार फुट उंचीच्या वर असलेले उच्च पातळीवरील तीन प्रकारचे ढग
i) सिरस : पक्ष्याच्या पांढऱ्या पंखाच्या समूहासारखे व फिंगरलेले दिसणारे, बर्फ स्फटिकानx भरलेले ढग असतात.
ii) सिर्रोकुमुलस : पांढरे, पातळ, कापसाच्या बँडेजसारखे असतात. उष्ण कटीबंधातील अटलँटिक महासागरातील चक्रीवादळात थंड व ताकदवार असतात, ते हेच ढग
iii) सिर्रोस्ट्रॅटस : पुर्ण आकाश कव्हर करतात. हिवाळ्यात कधी तर 24 तासात पाऊस किंवा बर्फ पाडतात
यामध्ये क्रमांक 1 मध्ये जे सांगितलेले जमिनीपासून साधारण 6 हजार 500 फुट उंचीपर्यंतचे व सर्वात निम्न पातळीवरील असलेले चार प्रकारचे ढग आहेत. या ढगांच्या निर्मितीसाठी सध्या आवश्यक असलेल्या अनुकूल वातावरणीय परिस्थितीच्या अभावामुळं मोसमी पाऊस व जिथे मान्सून पोहोचलाच नाही अशा ठिकणच्या पूर्वमोसमी पावसासाठी वातावरणात जोर नाही. अशा वातावरणात व ढगांच्या निर्मितीनंतर साधारण 21 ते 22 जूननंतर अथवा जून महिना अखेरीस तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात मध्यम ते चांगल्या पावसाची अपेक्षा असल्याचे माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या: