मुंबई : ज्येष्ठ नागरिकाच्या घरात घुसून 1.75 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, संगणक आणि कॅमेरा चोरल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पूर्व उपनगरातील मुलुंडमधील नवघर पोलिसांनी ही कारवाई केली. चोरट्यांनी रहिवासी इमारतीत घुसून एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरातील ऐवजावर डल्ला मारला होता. प्रकाश चिंदारीया (वय 37 वर्षे), जैनुद्दीज शेख उर्फ ​​सलीम (वय 40 वर्षे) आणि दीपक बिंदाचल प्रजापती उर्फ ​​लाला (वय 37 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून सर्व जण मुंबईतील सायन कोळीवाडा इथे राहतात.


मुलुंडमधील लक्ष्मी नटराजन (वय 63 वर्षे) आणि शिवकुमार पटेल (वय 42 वर्षे) यांच्या घरात ही चोरी झाली. यानंतर त्यांनी तक्रारीसाठी पोलीस स्टेशन गाठलं. त्यांच्या तक्रारीनुसार नवघर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भा.द.वि. कलम 380, 454 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपासाला सुरुवात केली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी त्यांच्या घराच्या दरवाजाला कुलुप लावून बाहेर गेले असता, आरोपींनी त्यांच्या घराचं कुलुप तोडून आत प्रवेश केला आणि ऐवज चोरुन पसार झाले. नवघर पोलीस स्टेशनमाधील गुन्हेप्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी सलग दहा दिवस अत्यंत चिकाटीने घटस्थळावरील तसंच आजूबाजूच्या परिसरातील 60 ते 70 ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासले. नमूद आरोपींनी वापरलेल्या वाहनांचा क्रमांक प्राप्त करुन संबंधित वाहनांच्या चालकांचा शोध घेतला. विश्वासात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. आरोपींच्या येण्या-जाण्याचा मार्ग काढून सापळा रचून त्यांना सायन कोळीवाडा परिसरातून ताब्यात घेतलं. 


संबंधित आरोपींना नवघर पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता, त्यांना गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार त्यांना चोरीच्या गुन्ह्याअंतर्गत रीतसर अटक करण्यात आली. आरोपींची चौकशी करुन त्यांनी चोरलेला ऐवज हस्तगत करत आहोत, अशी माहिती नवघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कांबळे यांनी दिली.