Federal Reserve Hike Interest Rate : अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. फेडरल रिझर्व्हने 0.75 टक्के वाढ केली आहे. अमेरिकेतील वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही व्याज वाढ केली असल्याचे फेडरल रिझर्व्हने म्हटले आहे. अमेरिकेतील या निर्णयाचा परिणाम भारतावरही होणार आहे. शेअर बाजारात आणखी पडझड होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 


अमेरिकेत मंदीचे सावट?


अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ करून वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले. अमेरिकेतील महागाईचा दर दोन टक्क्यांवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे फेडरल रिझर्व्हने म्हटले. अमेरिकेत येत्या काही दिवसांत अर्थव्यवस्था मंदावू शकते, इतकेच नाही तर देशातील बेरोजगारीचा दरही आणखी वाढू शकतो असेही फेडरल रिझर्व्हने म्हटले. 


भारतावर काय परिणाम होणार?


अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने महागाईवर नियंत्रण मिळवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार पावले उचलली जात आहेत. फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याज दरवाढीमुळे डॉलर आता आणखी मजबूत होणार आहे. त्यामुळे रुपयात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया आधीच कमकुवत झाला असून नीचांकी दर गाठला आहे. रुपया आणखी घसरल्यास भारताच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 


शेअर बाजारात पडझड ?


मागील काही महिन्यांपासून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढण्यावर भर दिला आहे. याआधीदेखील फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ केल्यानंतर परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढली आहे. आता, फेडरल रिझर्व्हने थेट 0.75 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आज, गुरुनवारी शेअर बाजारात पडझड होण्याची शक्यता आहे. 


फेडरल रिझर्व्ह व्याज दर वाढवणार असल्याच्या शक्यतेने बुधवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली होती. जागतिक पातळीवरही याचे पडसाद दिसून येत होते. आता, फेडरल रिझर्व्हने व्याज दरात मोठी वाढ केल्याने शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू राहण्याची शक्यता आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: