Marathwada Rain Update: जून महिना संपत आला तरी पुरेशा पावसाचा (Rain) पत्ता नाही. गेल्या दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पाऊस पडत असला तरी त्या पावसाने पेरणी करता येत नाही. दरम्यान आता अशात मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांसाठी (Farmers) आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात आज (26 जून) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 


प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार 26 जून रोजी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मेघगर्जना होईल, असा अंदाज परभणीच्या 'वनामकृ' विद्यापीच्या हवामान विभागाने वर्तवला आहे. 26 जून रोजी हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट होईल, असेही हवामान विभागाने सांगितले. रात्री आणि सकाळी काही भागांत पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.


हिंगोलीत 8.9 मिमी पावसाची नोंद


हिंगोली जिल्ह्यात अद्याप एकदाही मोठा पाऊस झाला नसला तरी खरीप पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना शनिवारी झालेल्या पावसाने थोडाचा दिलासा दिला. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या मागील 24 तासात 8.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. वखरणी, नांगरणी, काडी कचरा वेचणी आदी मशागतीची कामे बहुतांश ठिकाणी झाली आहेत. खते, बियाणांची खरेदीही सुरु आहे. मात्र, अद्याप एकदाही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यात शनिवारी रात्री पावसाने थोडासा दिलासा दिला. यामुळे चांगला पाऊस होईल, अशी अशा निर्माण झाली आहे. हिंगोली, डिग्रस कन्हाळे, सेनगाव, गोरेगाव, आजेगाव आदी परिसरात चांगला पाऊस झाला. मात्र, अजूनही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षाच आहे. दरम्यान, रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24  तासांत हिंगोली तालुक्यात सरासरी 17 मिमी, कळमनुरी 1.80 मिमी, वसमत 00, औंढा नागनाथ 5.50 मिमी तर सेनगाव तालुक्यात 19.10 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वसमत तालुक्यात मात्र अजून पावसाची हजेरी नाही. यावर्षी आतापर्यंत एकूण सरासरी 26.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे.


पेरण्यांना उशीर झाला... 


दरवर्षे 7 जूननंतर पावसाचा अंदाज वर्तवला जातो. तसेच या काळात पाऊस होईल अशी अपेक्षा देखील शेतकऱ्यांना असते. मात्र यंदा जून महिना संपत आला असताना देखील बहुतांश ठिकाणी पाऊसच पडला नाही. त्यामुळे पेरण्या देखील रखडल्या आहेत. पाऊस उशिरा पडल्यास पेरण्यांना देखील उशीरच होणार आहे. त्यामुळे याचे परिणाम उत्पादनावर देखील होण्याची शक्यता असते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Weather : मुंबई, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर वाढणार; पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता