Ratnagiri Accident : रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली (Dapoli) तालुक्यातील हर्णे मार्गावर रविवारी (25 जून) संध्याकाळी मॅक्झिमो (वडाप गाडी) आणि ट्रेलर यांच्यात भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात बाप-लेकीसह आठ जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये मॅक्झिमोचा चक्काचूर झाला. या अपघातामुळे दापोली आणि हर्णे पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर ट्रेलर चालकाने जंगलामध्ये पळ काढला.


कसा झाला अपघात?


दापोली तालुक्यातील हर्णे मार्गावर आसूद जोशी बागेजवळ काल संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला. बांधकाम साहित्य रिकामं करुन आलेला रिकामा ट्रेलर दापोलीकडे येत होता. यावेळी समोरुन मॅक्झिमो घेऊन हर्णेच्या दिशेने जात होते. यावेळी वडाप गाडीत 14 प्रवासी होते. दोन्ही गाड्या जोशी बागेजवळ अवघड वळणावर आल्या. यावेळी ट्रेलरने बाहेरुन वळण घेतले. यामुळे मॅक्झिमोला पुढे जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही.याचवेळी ट्रेलरने या गाडीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. 


अपघातात वडाप गाडीच्या चालकाचा मृत्यू, ट्रेलर चालकाचं पलायन


अपघातात मृत्यू झालेले सर्व दापोली तालुक्यातील होते. अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलीस  घटनास्थळी दाखल झाले होते.  जखमींना उपचारांसाठी सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे प्राथमिक उपचार करुन काही जणांना पुढील उपचारांसाठी मुंबईला पाठवण्याची माहिती आहे. या अपघातात मॅक्झिमो गाडीचा चालक अनिल सारंग यांचा मृत्यू झाला. ते हर्णे इथले रहिवासी होते. तर ट्रेलर चालकाने घटनास्थळावरुन पलायन केलं. 


रत्नागिरीत (Ratnagiri) अपघातांचं प्रमाण वाढलं


दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात अलिकडे रस्ते अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. तीन दिवसांपूर्वी दापोलीतून खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका आराम बसला नायगाव-घोडबंदर रोडवर अपघात झाला होता. या अपघतात बसमधील एकजण गंभीर जखमी झाला होता. प्रशांत भुवड असं जखमी प्रवाशाचं नाव आहे. तो दापोलीमधील रहिवासी आहे. कंटेनरला ओव्हरटेक करताना हा अपघाता झाला. तर 16 जून रोजी दापोली तालुक्यात उन्हवरे मार्गावर एसटी बस आणि प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच प्राण सोडले. सुरेश पाटील असं मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचं नाव आहे.


हेही वाचा


Ratnagiri News : पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार काश्मीरमधील कुपवाडामध्ये; शोध लागला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये!