Beed News Update : बीडच्या कुमशी गावातील शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून आर्थिक क्रांती साधली आहे. गटशेतीतून शेतकऱ्यांनी 25 एकरावर टरबुजाची लागवड केली असून शेतकऱ्यांना एकरी तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.


कुमशी गावातील चौदा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक गट तयार केला आणि या गटाच्या माध्यमातून टरबुजाची शेती करण्यायस सुरुवात केली. या शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये टरबुजाची लागवड केली. गटातील सर्व शेतकऱ्यांची मिळून 25 एकरावर टरबुजाची लागवड झाली. एका एकरातून 25 ते 30 टन उत्पन्न हे शेतकरी घेत आहेत. दहा ते अकरा रुपये भावाने या टरबुजाची विक्री होत असून 50 ते 60 हजार रूपयांचा खर्च वगळता एकरी तीन लाख रुपयांचे उत्पन्न प्रत्येक शेतकऱ्याला मिळत असल्याचे या गटातील शेतकरी तानाजी थोरात यांनी सांगितले. 


लक्ष्मण करपे या शेकतऱ्याने आपल्या दीड एकर क्षेत्रावर टरबुजाची लागवड केली आहे. लागवड आणि मशागतीसाठी त्यांना 50 हजार रुपये एवढा खर्च आला असून सध्या एक किलो पासून ते पाच किलो वजनापर्यंतची टरबूज त्यांच्या शेतामध्ये आहेत. यातून तीस टन उत्पन्न मिळेल आणि त्यातून तीन लाख रुपयांची अपेक्षा आहे, असे करपे यांनी सांगितले.  


पारंपरिक पिकांना फाटा देऊन या गावचे शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी एकत्र आले आहेत. गट शेतीच्या माध्यमातून शेती करत असल्याने या शेतकऱ्यांचा मजुरांवर होणारा खर्च देखील वाचला आहे. टरबूजा बरोबरच हे शेतकरी आता इतर फळबागांची देखील लागवड करत आहेत. एकत्र शेती केल्यामुळे शेतमालाची गुणवत्ता सुधारली असून या शेतकऱ्यांचा शेतमाल व्यापारी स्वतः गावात येऊन घेऊन जातात आणि यातून त्यांना चांगला भाव देखील मिळत आहे.


गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची विक्री करता आला नाही. याच अडचणीवर मात करण्यासाठी गेल्या वर्षापासून हे शेतकरी गट शेतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पिकांची लागवड करत आहेत. शिवाय हे शेतकरी सर्व शेतकऱ्यांच्या शेतीमालाची एकत्र विक्री करत आहेत. उत्पन्नवाढीसाठी या शेतकऱ्यांनी मशागत आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्याने त्यांच्या आर्थिक उत्पन्नात देखील दुपटीने वाढ झाली आहे, अशी माहिती शेतकरी आप्पासाहेब मोरे आणि मुकुंद थोरात यांनी दिली. 


महत्वाच्या बातम्या


हिंगोलीच्या शेतकऱ्याचा नाद खुळा; कुलरचा गारवा देत जरबेरा फुल शेतीचे उत्पादन


White Jamun : इंदापुरातील शेतकऱ्याची पांढऱ्या जांभळाची शेती, प्रतिकिलो 400 रुपयांचा दर