IMD On Monsoon : यंदा मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावली आहे. साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होणार मान्सून या वर्षी 29 मे रोजीच दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने जून महिन्यासाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याशिवाय यंदाच्या वर्षी किती पाऊस होईल याचाही  अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मान्सून सामान्य असणार आहे. तर, दीर्घकाळासाठी 103 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कर्नाटक, तामिळनाडू, कोकण आणि गोव्यात पावसासाठी अनुकूल स्थिती आहे. पुढील 2 ते 4 दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या 96 टक्के ते 104 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


मे महिन्यात  अपेक्षेपेक्षाही अधिक चांगल्या पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले. देशातील उर्वरित भागातही वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 


दर महिन्याला पावसाचा अंदाज


हवामान विभागाकडून दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी मान्सूनबाबत अंदाज वर्तवण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित महिन्यातील पावसाची स्थिती अधिक स्पष्ट होऊ शकते. 


शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा अंदाज


हवामान विभागाने मान्सूनबाबत नवीन अंदाज वर्तवताना जून महिन्यात शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी मिळू शकते असा अंदाज वर्तवला. जून महिन्यात मान्सून आधारीत कृषी क्षेत्रात सामान्याहून अधिक पाऊस होण्याचा अंदाज  आहे. 


स्कायमेटने काय वर्तवला होता अंदाज ?


हवामानाची माहिती देणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने देशभरातील यंदाच्या मान्सूनचा अंदाज एप्रिल महिन्यात जारी केला होता. यंदा मान्सून सामान्य राहील, असा अंदाज स्कायमेटने वर्तवलेला. या अंदाजानुसार देशभरात मान्सून (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या 98 टक्के राहण्याची शक्यता आहे. यात पाच टक्क्यांपेक्षा कमी किंवा जास्त एरर मार्जिन असल्याचे स्कायमेटने म्हटले होते. स्कायमेटने यापूर्वी 21 फेब्रुवारी रोजी मान्सूनचा अंदाज जारी केला होता, ज्यामध्ये यावर्षी मान्सून सामान्य असेल असे सांगितलं होते.