Farmer Success Story: भूक लागल्यावर किंवा आरोग्याच्या दृष्टीने आपण नेहमीच केळ खातो आणि तेही पिवळं. मात्र कधी तुम्ही लाल केळी खाल्ली आहे का?.. आता लाल केळी म्हणजे काय भानगड, असा अनेकांना प्रश्न पडला असेल. पण औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका शेतकऱ्याने याच लाल केळीची शेती करत अवघ्या 60 झाडातून वर्षाला 2 लाखांचे उत्पन काढले आहे. विशेष म्हणजे ही एक केळ 30 रुपयाला मिळते.
कन्नड तालुक्यातील अजय जाधव या प्रगतीशील शेतकऱ्याने अडीच गुंठ्यात 500 केळीची झाडे लावली आहे. यात 60 झाडं लाल केळीची आहे. 10 वर्षांपूर्वी त्यांनी ही झाडे लावली होती. एका झाडाला सरासरी 15 किलोचा घड लागतो आणि ही केळ 300 रुपये प्रतीकिलो विकली जाते. त्यामुळे जाधव यांना लाल केळीच्या 60 झाडातून सरासरी वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांचे होते. विशेष म्हणजे यासाठी ग्राहक शोधण्याची गरज नसते. कारण जाधव यांच्याकडे लाल किळीसाठी आधीपासूनच ग्राहकांकडून बुकिंग केलेली असते, असं ते म्हणाले.
वर्षातून फक्त तीन वेळा पाणी...
कृषी खात्यानुसार दरवर्षी केळी लावावी आणि एकच खोड ठेवावा, दुसऱ्या वर्षे ते काढून फेकावे असे सांगितले जाते. मात्र आम्ही 2011 मध्ये लावलेली केळी काढलीच नाही. तस केळीला दिवसातून तीन वेळा पाणी द्यावे लागते. आम्ही मात्र वर्षातून फक्त तीन वेळा पाणी देतो. कारण झाडांना आम्ही सक्षम केलं, असं जाधव सांगतात.
लाल केळीचे फायदे!
लाल केळी नियमित खाल्ल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. तसेच लाल केळी डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून, त्यात पोटॅशिअम असल्याने हाडे बळकट होतात. लाल केळी खाल्ल्याने हेमोग्लोबिन वाढण्यास फायदा होतो आणि त्यात ट्रायटोफन असल्याने मन शांत राहते.
बाजरात मागणी...
लाल केळीचे अनेक फायदे आहेत. सोबतच अनेक आजारांवर लाल केळी खाल्ल्याने मात करू शकतो. त्यामुळे बाजारात लाल केळीला मागणी आहे. 300 रुपये प्रतिकिलो विकणार लाल केळ 30 रुपयाला एक मिळते. उत्पन अल्पप्रमाणात असल्याने ग्राहक आधीपासूनच बुकिंग करून ठेवतात.